Shivsena ubt | ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का? बडा नेता ACB च्या रडारवर! मालमत्तेच्या चौकशीने खळबळ
Tv9 Marathi June 06, 2026 03:45 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, त्यांची रत्नागिरीत ACB कडून चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. वैभव नाईक यांच्या मालमत्तेबाबत माहिती मिळवण्यासाठी रत्नागिरी ACB ने कणकवली नगरपंचायतीला पत्र पाठवले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैभव नाईक यांनी 2002 आणि 2006 मध्ये खरेदी केलेल्या दुकान गाळ्यांबाबत ACB कडून माहिती मागवण्यात आली आहे. संबंधित मालमत्ता दोन स्वतंत्र गाळे आहेत की एकच मालमत्ता आहे, याबाबतची माहिती कणकवली नगरपंचायतीकडून मागवण्यात आली असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, वैभव नाईक यांच्यावरील ही चौकशी 2022 पासून सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

या चौकशीबाबत प्रतिक्रिया देताना वैभव नाईक यांनी कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचे स्पष्ट केले. “जी काही चौकशी सुरू आहे, तिला मी सामोरा जाईन. येणाऱ्या काळात सर्व प्रश्नांची उत्तरे देईन. गेल्या पाच वर्षांपासून माझी चौकशी सुरू आहे. अनेकांच्या चौकशा सुरू झाल्या आणि नंतर बंदही झाल्या, मात्र माझी चौकशी आजही सुरू आहे. हा अन्याय असून त्याविरोधात मी लढणार आहे,” असे नाईक यांनी म्हटले. दरम्यान, कोकणातील ठाकरे गटाला लागलेल्या गळतीच्या पार्श्वभूमीवर या चौकशीकडे अधिक महत्त्वाने पाहिले जात आहे. यापूर्वी राजापूरचे माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळा माने यांनीही ठाकरे गटाला रामराम ठोकला आहे.

अशा परिस्थितीत कोकणातील ठाकरे गटाचे मोजके प्रभावी नेते म्हणून वैभव नाईक यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे ACB चौकशीच्या या घडामोडींमुळे कोकणातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.