राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून कोणाचे नाव? सुनेत्रा पवारांनी बारामतीच स्पष्टच सांगितलं
Marathi June 06, 2026 08:25 PM

सुनेत्रा पवार : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खासदारकीच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसंदर्भात कोणाला संधी मिळणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यसभेच्या जागेवर अनेक नावे चर्चेत आहेत. आज संध्याकाळपर्यत किंवा उद्या सकाळपर्यंत नाव समजेल अशी माहिती खुद्द सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे इच्छुक असल्याचे मानले जात आहेत. पण आता सुनेत्रा पवार कोणाला संधी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

राज्यसभेच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मंत्री छगन भुजबळ राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याची तसेच त्यांच्या जागी माजी खासदार समीर भुजबळ यांची वर्णी लावण्यात यावी अशी विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांकडून भाजप श्रेष्ठींसोबत चर्चा करून आज रात्री उशिरा पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कळवण्याबाबत आश्वासन देण्यात आलं आहे.

तटकरेंच्या कुटुंबासारखा भुजबळांच्या कुटुंबाला न्याय का नाही?

छगन भुजबळ यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत पक्षाच्या सुरुवातीपासूनच्या जडणघडणीत कशा प्रकारे भुजबळ कुटुंबाचा पुढाकार आहे. अजित पवार यांचं कुटुंब, तटकरे यांचं कुटुंब यांना जो न्याय लावण्यात आला तो भुजबळ कुटुंबाला का नाही? असा सवाल देखील उपस्थित करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अजित पवार आणि तटकरे कुटुंबातील एक व्यक्ती केंद्रात आणि एक व्यक्ती राज्याच्या मंत्रिमंडळात आहे.

सुनेत्रा पवारांकडून  नुकसानग्रस्त केळीची पाहणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे नुकसान ग्रस्त केळीची पाहणी केली .यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या. तसेच आणखी किती नुकसान झालं आहे याची माहीती घेऊन सरकारकडून मदत दिली जाईल असे सुनेत्रा पवार म्हणल्या. यावेळी त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात विचारण्यात आले, त्यावेळी त्या बोलतच होत्या.

Rajya Sabha Seat : अमोल मिटकरींची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत

अमोल मिटकरींनी यासंदर्भात पोस्ट करत म्हटलंय की, आदरणीय सुनेत्रावहिनींची राज्यसभेची रिक्त जागा ही फक्त राष्ट्रवादीचीच आहे! यावर दुसऱ्या कुणी हक्क सांगून मोर्चेबांधणी करू नये. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला “अजितदादा”नावाचं अधिष्ठान आहे. त्यामुळे आदरणीय वहिनी घेतील तोच निर्णय अंतिम राहील. हा पक्ष अजितदादांचा दरारा असणारा पक्ष आहे. तुर्तास इतकेच, असंही अमोल मिटकरींनी म्हटलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.