मान्सून महाराष्ट्रात दाखल! पुण्यात पुढील ४ दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'
esakal June 07, 2026 12:45 PM

पुणे, ता. ६ : शहरात दररोज सायंकाळी पावसाचे ढग दाटून येत असले, तरी प्रत्यक्ष मात्र पावसाने दडी मारल्याने पुणेकरांची घोर निराशा होत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचे केवळ वातावरण तयार होत असून, प्रत्यक्षात मात्र उन्हाच्या चटक्यांनी आणि असह्य उकाड्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. पावसाची प्रतीक्षा कायम असली तरी, पुढील तीन ते चार दिवस शहर आणि परिसरात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील चार दिवस शहराला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.

गेल्या तीन-चार दिवसांपासून शहरात सकाळपासूनच कडक ऊन पडत आहे. शनिवारी (ता. ६) कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसच्या आसपास, तर किमान तापमान २५.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. दुपारपर्यंत उन्हाच्या तीव्र झळा आणि घामाच्या धारांनी नागरिक हैराण होत आहेत. मात्र, सायंकाळी चारच्या सुमारास अचानक हवामानात बदल होऊन आकाशात ढग जमा झाले. मात्र, पावसाची प्रतीक्षा कायम राहिली.

मान्सूनची महाराष्ट्रात एन्ट्री! रत्नागिरी, सिंधुदुर्गसह कोल्हापूरचा काही भाग व्यापला; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता

दरम्यान, हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, रविवारपासून (ता. ७) तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत, तर किमान तापमान २४ अंशांपर्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. सकाळच्या सत्रात प्रामुख्याने आकाश निरभ्र राहील. मात्र, दुपारनंतर पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होऊन विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.