Akola : पतीला पाठीवर घेऊन उपचारासाठी धावाधाव, नर्सपासून डॉक्टरांपर्यंत विनवण्या; कुणीच मदत केली नाही, VIRAL व्हिडीओने खळबळ
esakal June 07, 2026 12:45 PM

अकोला, ता. ६: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना शुक्रवारी (ता.५) समोर आली. उपचारासाठी आलेल्या एका महिलेने आजारी पतीला पाठीवर घेऊन रुग्णालयातील विविध विभागांमध्ये उपचारासाठी विनवण्या केल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. विशशेष म्हणजे, बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू असतानाच हा प्रकार घडल्याने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. Viral Video Raises Questions Over Akola Hospital Care

संबंधित महिला शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आपल्या पतीला उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात घेऊन आली होती. पतीची प्रकृती खालावलेली असल्याने तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता होती. मात्र रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तिला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

महागाईचा भडका! घरगुती LPG सिलिंडरच्या दरात वाढ, १४.२ किलो सिलिंडरची नवी किंमत किती

महिलेने वॉर्ड बॉय, परिचारिका आणि डॉक्टरांकडे मदतीची विनंती केली. मात्र कोणत्याही स्तरावर तातडीची मदत मिळाली नसल्याने तिने आपल्या पतीला पाठीवर घेत रुग्णालयातील विविध विभागांमध्ये उपचारासाठी धावपळ केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ उपस्थित काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला. काही वेळातच हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि त्यानंतर या प्रकाराची सर्वत्र चर्चा सुरू झाली. विशेषतः सर्वोपचार रुग्णालय हे जिल्ह्यातील प्रमुख शासकीय आरोग्य केंद्र असून दररोज हजारो रुग्ण येथे उपचारासाठी येतात. अशा ठिकाणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अशा प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या व्हिडिओची रुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार संबंधित रुग्णाला उपचार नाकारण्यात आले नव्हते. नेमके काय घडते, कोणत्या विभागात रुग्णाला नेण्यात आले आणि त्या वेळी ड्युटीवरील कर्मचाऱ्यांनी काय कार्यवाही केली, याची सविस्तर चौकशी सुरू करण्यात आली आहे. व्हिडिओमधील सर्व बाबींची पडताळणी करून वस्तुस्थिती समोर आणली जाईल. चौकशीत कोणत्याही कर्मचाऱ्याचा हलगर्जीपणा आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. - डॉ. संजय सोनुने, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

प्रशासनाकडून प्रकरणाची चौकशी

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने वा प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली आहे. घटनेच्या वेळी ड्युटीवर असलेल्या डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांची माहिती घेतली जात असून नेमकी परिस्थिती काय होती, याची माहिती मागविण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.