मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
Tv9 Marathi June 06, 2026 09:45 PM

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभा सदस्यत्वाच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाला संधी द्यायची, यावर महायुतीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ इच्छुक असल्याची माहिती समोर आली असून, त्यांच्या उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन छगन भुजबळ यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासोबतच, भुजबळ यांच्या जागी माजी खासदार समीर भुजबळ यांना महत्त्वाची जबाबदारी देण्याबाबतही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून निर्णयाची माहिती राष्ट्रवादीच्या नेत्यांना देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे राज्यसभा उमेदवारीबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, छगन भुजबळ यांना दिल्लीत संधी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात असून, समीर भुजबळ यांनाही केंद्रात राज्यमंत्रिपद मिळू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ८ जून दुपारी ३ वाजेपर्यंत असल्याने पुढील दोन दिवसांत या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत छगन भुजबळ यांनी पक्षाच्या स्थापनेपासून भुजबळ कुटुंबाच्या योगदानाचा उल्लेख करत, अजित पवार आणि तटकरे कुटुंबांप्रमाणे भुजबळ कुटुंबालाही योग्य प्रतिनिधित्व मिळावे, अशी भूमिका मांडल्याचे समजते. त्यामुळे आता महायुतीच्या निर्णयाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.