अनघा शिराळकर - saptarang@esakal.com
भुवनेश्वरीचा कल्लोळ’ ही डॉ. रंजन गर्गेलिखित वैज्ञानिक कादंबरी आहे. कादंबरीच्या मुखपृष्ठावरूनच भुवनेश्वरीच्या म्हणजे पृथ्वीच्या कल्लोळाची कल्पना येते. कादंबरीचा ‘क्लाय-फाय विज्ञान कादंबरी’ असा उल्लेख मुखपृष्ठावर केलेला असला तरी ती केवळ ‘क्लायमेट फिक्शन’ (क्लाय-फाय) म्हणजेच हवामान व विज्ञान यावर नसून ती मानवाच्या अस्तित्वासाठी चाललेल्या संघर्षाची कथा आहे.
कादंबरीमध्ये पर्यावरणीय संकट, विज्ञानाची प्रगती, माणसांच्या पिढ्यांमधील दरी, टेस्ट ट्युब बेबी व सरोगसी तंत्रज्ञान, कीटकनाशकाच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम, मधमाशी प्रकल्प, कोरोनाचा कहर, नैसर्गिक आपत्तींपासून स्वतःचं संरक्षण करण्याचे मानवाचे केविलवाणे प्रयत्न, वेगाने विकसित होणारी अत्याधुनिक रोगचिकित्सा आणि औषधोपचार पद्धतीमुळे वाढत चाललेले मानवाचे आयुष्यमान, मानवी मस्तकाचे प्रत्यारोपण, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने मंगळावरील मानवी जीवनाच्या अस्तित्वाचा घेतलेला शोध, क्लोनिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने पृथ्वीवरील लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या मंगळग्रहावरील १२ ते १५ लाख वर्षांपूर्वी जन्मलेल्या सुमारे ३६ वर्षे वयाच्या पुरुषाच्या जीवाश्म झालेल्या मेंदूची कथा, त्या जीवाश्माच्या ‘डीएनए’वरून पृथ्वीवरील काही जमातीतील मानवाच्या डीएनएशी पडताळणी करणे, भविष्यातील अतिप्रगत तंत्रज्ञान, इत्यादी विषयांवरील माहिती लेखकाने अत्यंत रंजकपणे कथासूत्रात गुंफली आहे.
Marathi New Books Review : नव्या मराठी पुस्तकांचा मेळा; संगीत, नाती, बौद्ध तत्त्वज्ञान आणि अमेरिकेच्या प्रवासकथांचा बहुरंगी आस्वादएकूण बारा प्रकरणांत विभागलेली ही कादंबरी चार पिढ्यांभोवती फिरते. यामध्ये सुशांत हा विक्षिप्त स्वभावाचा, पण उद्योगजगतातील जाणकार व त्याची घमेंडखोर पत्नी अनुष्का हे एक घटस्फोटित जोडपे. सनी आणि मोना हे रिलेशनशिपमध्ये राहणारे व्यावसायिक अंतराळवीर जोडपे. सनी आणि मोना यांची अनोळखी डोनर्सपासून झालेली टेस्ट ट्यूबबेबी शामली उर्फ शमा, हिचा जन्म अनुष्का या घटस्फोटित सरोगसी मातेच्या पोटी होतो. मोठी झाल्यावर शमा आपले खरे पालक शोधण्याचे आटोकाट प्रयत्न करते. तांत्रिक मर्यादांमुळे तिला फक्त तिच्या पित्याचे नाव कळते. शमा म्युझियम मॅनेजमेंट स्टडीजचा दोन वर्षांचा कोर्स पूर्ण करून देशोदेशी वैज्ञानिक प्रदर्शन भरवणे सुरू करते. तिची गोव्याच्या ओशोनोग्राफी इन्स्टिट्यूटमध्ये निनाद मौर्य या तरुण हवामानशास्त्रज्ञाशी भेट होते. या प्रकल्पानंतर निनादची पीएच.डी. पूर्ण होऊन त्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीत जीवशास्त्राच्या संशोधनगटात काम करण्याची संधी मिळते. पुढे निनाद व शमा एकत्र राहू लागतात. अनेक अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व उपचारांचा वापर करून त्यांना आरुषी ही मुलगी होते.
संसाराच्या जबाबदाऱ्यांना कंटाळून शमा स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेते. डॉ. निनाद हाच आरूषीचा सांभाळ करतो. आरूषीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ती एक दिवस घर सोडून निघून जाते. दहा वर्षांनी निनाद तिला अमेरिकेतील डल्लास इथे शोधून काढतो. आरूषीचा पती तिला व मुलगा कबीर यांना सोडून निघून गेलेला असतो. आरूषी आपला स्वमग्न (ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर) मुलगा कबीर याच्याबरोबर रहात असते. आरूषी जिथे रहात असते तिथे चक्रीवादळाने खूप वाताहत केलेली असते. पाणी, पूर, वादळे यांचा कबीरच्या मनावर खूप ताण येऊन तो घाबरत असतो. तिधेही एका चक्रीय वादळात सापडतात. डॉ. निनाद या वादळातून सगळ्यांना सहीसलामत बाहेर काढतो. कबीरच्या त्रासाला कंटाळून आरूषी बेमालूमपणे गायब होते. मोठ्या प्रयासाने आजोबा डॉ. निनाद कबीरला भारतात आणतात. कबीरचा सांभाळ करतात. कबीर स्वमग्न असला तरी त्याला चित्रे काढण्याचा, निसर्गाच्या निरीक्षणाचा आणि सतत काहीतरी शोधण्याचा छंद असतो. आजोबा डॉ. निनाद यांनी त्याला दिलेल्या मायक्रोस्कोपखाली किडे, मुंग्या, मधमाशा, पाने, फुले, इत्यादींचे निरीक्षण चालू असते. पुढे कबीरचे काय होते? शमा काय करते? आरूषी व तिचा मुलगा कबीर यांची भेट कशी होते? या सर्व घटना व वैज्ञानिक संदर्भ मुळातून वाचण्यासारखे आहेत.
पिढ्यांमधील अंतर, बदलती जीवनमूल्ये आणि संस्कृती यांमुळे होणारे संघर्ष या कादंबरीत प्रभावीपणे रेखाटण्यात आले आहे. कादंबरी पूर्ण वाचल्यावर, मानवीजीवनात ‘प्रेम’ हाच काळाच्या अंधारातील एकमेव चमकता तारा आहे. या मुखपृष्ठावरील वाक्याची प्रचिती येते. ही कादंबरी आधुनिक विज्ञानाच्या प्रगतीमुळे निर्माण होणाऱ्या ‘मानव विरुद्ध निसर्ग’ या संघर्षाचे प्रभावी चित्रण करते.
लेखक डॉ. गर्गे यांची भाषा ओघवती, प्रभावी आणि भावस्पर्शी आहे. त्यामुळे सामाजिक जाणीव आणि भावनिक खोली असलेली ही कादंबरी वाचकांच्या मनावर ठसा उमटवते.
पुस्तक : भुवनेश्वरीचा कल्लोळ
लेखक : डॉ. रंजन गर्गे
प्रकाशक : ऑथर्स प्रेस, नवी दिल्ली
पृष्ठे : १६४, मूल्य : २९५ रु.
View this post on Instagram