लेकीला सायकल विकत घ्यायची होती, म्हणून दुकानात गेलो – दुकान कसलं, मॉलच होता तो सायकलींचा! तिच्यापेक्षा मीच जास्त हरखून गेलो – किती वेगवेगळ्या सायकली होत्या तिथे! वेड लागायची वेळ आली. अनेक वर्षांनी सायकलच्या अद्भुत विश्वात प्रवेश झाला...
मी सायकल शिकलो ती भाड्याने घेतलेल्या सायकलींवर. त्याकाळी कल्याणमध्ये सायकली भाड्याने मिळण्याची दोन दुकानं होती. तिथे निळ्या किंवा लाल रंगाच्या उंचीनुसार सायकली मिळायच्या. मी शिकलो तेव्हा तासाला आठ आणे म्हणजे पन्नास पैसे असा दर होता, आणि नंतर तो वाढत एक किंवा दीड रुपया झाला असेल. पण लवकरच दुकानं बंद पडली, कारण प्रत्येकाच्या घरी आपापल्या सायकली येऊ लागल्या. ‘एकत्रितरीत्या वापरा’कडून ‘माझं, स्वतःचं असण्या’कडे होत असलेला हा मोठा ‘शिफ्ट’ होता.
आमच्या वर्गातल्या काही मुलांकडे स्वतःच्या सायकली आल्याचं पाहून मग मीही माझ्या बाबांकडे हट्ट केला. ती गरजही होती. माझी शाळा घरापासून दोन मिनिटांच्या अंतरावर असल्याने मी चालतच जायचो. पण आठवीपासून माझे दोन क्लास रामबाग परिसरात होते. म्हणजे बऱ्यापैकी लांब. तिथे जायला रिक्षा करण्यापेक्षा एकदाच सायकल घेतली असती तर ती जास्त चांगली ‘इन्व्हेस्टमेंट’ ठरली असती. शिवाय मी फुटबॉल खेळायला, क्रिकेटच्या प्रॅक्टिसला आणि सुट्ट्यांमध्ये मित्रांबरोबर आधारवाडीमार्गे गांधारी पूल असं जायचो, तेव्हाही सायकल कामी आली असतीच. आणि मित्रांप्रमाणे स्वतःची सायकल ‘मिरवणं’ हवं होतंच!
Premium|Nostalgic Indian parents return from USA : निसर्गाची मुक्त उधळण अन् लेकीची जड अंतःकरणाने पाठवणी; एका वडिलांचा भावूक अमेरिका प्रवासबाबा म्हणाले, ‘घेऊ या. पण थोडं थांब. दिवाळीत घेऊ.’ माझ्या लगेच समजलं, बाबा ढील देत नाहीयेत किंवा टोलवाटोलवीही करत नाहीयेत. दिवाळीत सायकल नक्की मिळणार. कारण त्यांना म्हणे तेव्हा बोनस मिळायचा, असं मी त्यांच्या आणि आईच्या संभाषणात बरेचदा ऐकलं होतं. म्हणून बरेचदा नवी वस्तू किंवा घराचं रंगकाम वगैरे करून घ्यायचं असेल की दिवाळी ठरलेली असे. मी दिवाळीची वाट पाहू लागलो. दोनतीन महिनेच बाकी होते – तेवढीच कळ काढायची होती, की मग आपली सायकल - स्वतःची!
मग एकदाची ती वेळ आली – मी आणि बाबा सायकलींच्या दुकानात गेलो – सायकलींचे तीन प्रकार होते – हर्क्युलसची घोडा सायकल. तगडी, मजबूत, कितीही ताणा, एकदम टिकाऊ. बीएसए एसएलआर. बारकुडी पण बुंगाट पळणारी आणि नुकतीच आलेली एमटीबी – जाड चाकांची, हँडलला शिंगं असलेली. आणखीही होत्या, एमटीबीसारख्या गिअरच्या. त्या पाहून मी म्हणालो, ‘बाबा, सुशांतकडे अशीच आहे सायकल! कसली भारी पळते माहितेय, आणि गिअरचे आवाज – कटक कट येतात. ज्याम मजा येते.’ पण बाबांनी त्यांच्या किमती ऐकून आधीच नको सागितलं. मी काहीसा हिरमुसलो, पण मला मनातून ती सायकल मिळणार नाही याची तशी कल्पना होतीच.
त्याखालोखाल मला आवडली होती, एमटीबी. त्या वेळी, त्या वयात तरी एकदम स्टायलिश वाटायची आम्हाला. आमच्या मित्रांमधल्या बऱ्याच जणांनी एमटीबीची, जाड टायरची आणि शिंगवाल्या हँडलची सायकल घेतली होती. त्यामुळे मलाही ती हवी होती – मरून रंगाची. सुई, सुर्र आवाज करत पळणारी. अहाहा... झकास!
बाबा त्या दुकानदाराला बाजूला घेऊन गेले आणि त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं. मला साधारण अंदाज आला. ते किमतीबद्दल बोलत असणार. तसंच किती टिकेल, वॉरंटी-गॅरंटी वगैरेबद्दल. मी मनातल्या मनात स्वतःला सांगितलं, तुला एमटीबी मिळणार नाहीये बहुतेक. पण हरकत नाही, स्वतःची सायकल असणं महत्त्वाचं.
माझ्याजवळ बाबा म्हणाले, ‘ही बीएसए एसएलआरची किती छान आहे बघ.’
मी म्हणालो, ‘बाबा, मुलींच्या लेडीबर्डसारखी वाटते ती.’
बाबा म्हणालो, ‘अरे असं काही नाही. तिचे टायर बारीक आहे, त्यामुळे म्हणे ती जोरात पळते.’ दुकानदार काकांनीही त्यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. आधी ठरलं असणार त्यांचं!
मी म्हणालो, ‘चालेल. पण मला मरून रंगच हवा.’
बाबा दुकानदाराकडे पाहून हसत म्हणाले, ‘मरून रंगाची द्या.’
नंतर मला समजलं की, मघाशी बाबा त्या दुकानदाराशी हफ्त्यांबद्दल बोलत होते. ती सायकल आम्ही ‘ईएमआय’वर घेतली होती. सायकल घेताना पाव रक्कम भरायची आणि मग महिन्याला ठरलेला हफ्ता. तेव्हा मला ती आयडिया फारच आवडून गेली होती. टीव्ही, फ्रीज अशा वस्तू आम्ही तशाच घेतल्या होत्या.
चकाकत्या मरून रंगाची, सुई असा आवाज करणारी कोरी करकरीत बीएसए एसएलआर सायकल आमच्या सोसायटीच्या खाली उभी केली. आईने फुलं वाहून, कुंकू लावून तिची पूजा केली. हार घातला. शेजारपाजारच्यांना आम्ही साखरही वाटली. तेव्हा मला वाटलं आपण राजा झालो आहोत आणि आपलं सिंहासन म्हणजे आपली सायकल!
पहिले काही दिवस मित्रांनी ‘ए लेडीज सायकल आणली’, ‘ए लेडीबर्डसारखी सायकल’ असं चिडवलं खरं, पण मी मनातल्या मनात खट्टू होऊनही तसं दाखवलं नाही. दुर्लक्ष केलं! स्वतःला समजावलं, ‘आपली’ सायकल असणं महत्त्वाचं. आपण हवं तसं फिरू शकतो आता. कुठेही कसंही. कुठे लांब जायचं असेल तर आईकडे रिक्षासाठी पैसे मागायची गरज नाही... खरंच होतं ते, त्या वयात सायकल हे माझा परीघ विस्तारण्याचं, स्वतंत्र होण्याचं लहानसं का होईना, एक प्रतीक होतं....
एकदा पावसाळ्यात सायकलवरून आम्ही आम्ही मित्र थोडं लांब, कल्याणजवळच्या लेण्या पाहायला गेलो होतो. लेण्या टेकाडासारख्या भागावर असल्याने चढाचा रस्ता होता. चढ चढताना आम्हा सगळ्यांचीच वाट लागली. वेग मंदावलाच, पण जोर लावून, पुढे झुकून सीटवरून उतरून पायडल मारावे लागले. पावसाळी गार वारा असूनही घामाघूम व्हायला झालं. पायात गोळे आले... पण आम्ही चढ चढत राहिलो. आणि एका क्षणी तो संपला, आणि उतार सुरू झाला.... सायकलीने वेग घेतला, पायडल मारायची गरज संपली आणि आम्ही जणू वाऱ्यावर स्वार होत पुढे जात होतो. उडतच होतो! आमच्या सायकली वेगळ्या असल्या तरी त्या वेळी त्या वेगाने आमच्या सायकलींचा आवाज एकरूप होऊन झाला. जणू आम्ही एक ध्वनी झालो. काय फिलिंग होतं ते, वेगळंच, मुक्त करणारं...
सायकलमुळे मला कळलं, मी वेगळा माणूस आहे, मुक्त आणि स्वतंत्र आहे.
सायकलमुळे मला कळलं, चढानंतर उतार येतो आणि उतारानंतर पुन्हा चढ, चक्र असतं ते!
View this post on Instagram