पुण्यात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई, 'प्रोजेक्ट एक्स' हाऊस पार्टीवर क्राईम ब्रँचची रेड, तरुण-तरुणी पोलिसांच्या ताब्यात
मिकी घई, एबीपी माझा, पुणे June 07, 2026 11:13 AM

Pune Crime News: पुण्यातील आळंदी–मरकळ रस्त्यावरील (Alandi-Markal Road) एका बंगल्यात मध्यरात्री सुरू असलेल्या हाय-प्रॉफाईल (High-profile) पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) शनिवारी रात्री उशिरा छापा टाकला. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) हद्दीतील तुळापूर परिसरात ही कारवाई करण्यात आली. या पार्टीला "प्रोजेक्ट एक्स" (Project X) असे नाव देण्यात आले होते. या छाप्यात सुमारे 60 ते 70 तरुण-तरुणी उपस्थित असल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे.

Pune Crime News: गोपनीय माहितीवरून पोलिसांचा छापा

पुण्यात अशा बेकायदेशीर पार्ट्यांचे आयोजन वारंवार केले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर, पुणे क्राईम ब्रँच यावर बारीक लक्ष ठेवून होती. शनिवारच्या रात्री तुळापूर येथील एका बंगल्यात मोठ्या प्रमाणावर तरुण-तरुणी एकत्र जमल्याची आणि तिथे अंमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. माहिती मिळताच क्राईम ब्रँचच्या तब्बल 100 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने मध्यरात्रीच्या सुमारास या बंगल्याला वेढा घातला आणि अचानक छापा टाकला.

Pune Crime News: अंमली पदार्थांचा वापर झाल्याचा संशय

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांचा वापर झाल्याचा तीव्र संशय आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून नशेसाठी वापरले जाणारे काही संशयास्पद पदार्थ जप्त केले आहेत. तसेच, पार्टीत उपस्थित असलेले काही तरुण-तरुणी पोलिसांना नशेच्या अवस्थेत आढळून आले. याशिवाय, राज्य उत्पादन शुल्क विभागाची कोणतीही परवानगी न घेता तिथे विनापरवाना मद्यविक्री सुरू होती, तसेच हाय-डेसिबल साऊंड सिस्टिमचा वापर करून मध्यरात्रीपर्यंत धांगडधिंगा सुरू होता.

Pune Crime News: आयोजकांसह तरुणांची कसून चौकशी

अशा व्यावसायिक किंवा हाऊस पार्टीसाठी पोलीस आणि एक्साईज (Excise) विभागाची रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असते. मात्र, आयोजकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून या पार्टीचे आयोजन केले होते. सध्या पोलिसांनी जप्त केलेले संशयास्पद पदार्थ प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत. पार्टीमधील तरुण-तरुणींसह या 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीच्या मुख्य आयोजकांची सध्या कसून चौकशी सुरू आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, आणि हे अंमली पदार्थ कुठून आणले गेले, याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या धक्कादायक प्रकारामुळे पुणे शहर आणि परिसरात पुन्हा एकदा ड्रग्ज आणि बेकायदेशीर पार्ट्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत.

आणखी वाचा 

Buldhana Crime Case: बुलढाण्यातील बहुचर्चित शिवानी कळमेकर बनावट हत्याकांडात पुन्हा ट्विस्ट; कळमेकर पिता पुत्रांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले...

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.