Dr Subodh Kerkar Art Journey : समुद्राच्या लाटांतून घडलेली डॉ. सुबोध केरकर यांची कलायात्रा
esakal June 07, 2026 09:45 AM

हर्ष भटकळ - saptrang@esakal.com

समाज माध्यमांचा उपयोग स्वतःच्या प्रसिद्धीसाठी न करता कला शिक्षणासाठी त्याचा वापर ते करतात. ‘माझ्यासाठी इंस्टाग्राम ही कलाशिक्षणाची सोय आहे,’ असे ते सांगतात. ज्यांच्या कलाजीवनात समुद्र आणि त्याची विविध रूपं प्रकट होतात, ते डॉ. सुबोध केरकर संत तुकारामांचा आदर्श मानतात. ते म्हणतात, ‘सागराच्या लाटा फक्त पत्थर आणि वाळू यातून आकार निर्माण करत नाहीत, तर सांस्कृतिक जाणिवांवरही परिणाम करतात.’ उच्चभ्रू समाजात अडकलेली कला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायची त्यांची इच्छा आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील बालपण

सुबोध यांचे बालपण सर्वसाधारण गोव्याच्या कुटुंबात गेले. त्यांचे वडील शिक्षक होते आणि ते सवड मिळेल तेव्हा चित्रे काढत असत. जवळजवळ शतकापूर्वी विख्यात पेंटर सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांच्या कलाविश्वाशी केरकर कुटुंबाचा संबंध आला. १९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी हळदणकर यांचे बंधू ब्रिटिश इंडियातून बाहेर पडून त्यांनी गोव्यातील केरकरांचे मूळ गाव केरी येथे आश्रय घेतला. हळदणकर आपल्या भावाला भेटायला त्या गावात आले आणि त्यांनी समुद्राचे लँडस्केप चित्र तयार केले. त्याच वेळी त्यांनी सुबोधच्या आजोबांचे तयार केलेले पोट्रेट अजूनही त्या कुटुंबात आहे. सुबोधच्या वडिलांवर त्या घटनेचा परिणाम झाला. जरी त्यांनी शिकवण्याचा व्यवसाय निवडला, तरी त्यांनी हयातभर पेंटिंगशी संबंध राखला. ‘‘आम्ही मुलं त्यांच्या रंगफलकावर रंग ट्यूबमधून काढून ठेवत असू आणि ब्रश धुवून ठेवणं हे आमचं काम असे,’’ केरकर आठवतात. सुबोध पंधरा वर्षांचा होईतो वॉटर कलरमध्ये उत्तम पारंपरिक चित्रे काढत असे.

डॉक्टर कलेकडे वळले

काही घटना वेगळ्याच दिशेने जाऊ लागल्या. सुबोध एक हुशार विद्यार्थी असल्यामुळे ते बोर्डाच्या परीक्षेत सातवे आले. त्यांनी डॉक्टर व्हायचे ठरवले आणि गोव्यातील एक यशस्वी डॉक्टर होते. ‘‘मी डॉक्टर झालो ते चुकून पण मी त्यातून लवकरच सावरलो.’’ कला आसपास होतीच. वैद्यकीय शिक्षण घेत असतानाही ते वर्तमानपत्रात कार्टून काढायचे. तेव्हा ‘द इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ हे टाइम्सच्या वतीने प्रसिद्ध होत असे आणि संपादक होते एम. व्ही. कामत. त्यात ते कार्टून काढत असत. काही काळाने डॉ. सुबोध केरकर यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडून संपूर्ण लक्ष कलेकडे द्यायचे ठरवले, तरीही त्यांचे समाधान होईना. ‘फक्त कसब म्हणजे कला नव्हे याची जाणीव त्यांच्या विचारांना नवीन दिशा देऊ शकली. फक्त भाषेचे व्याकरण समजणे यामुळे कोणी लेखक होऊ शकत नाही. तुमच्याकडे सांगण्यासारखे काहीतरी असायला हवे.’

Atul Dodiya art journey : गांधीवादी दृष्टिकोनातून समकालीन कलेचा शोध; अतुल दोडिया यांचा बहुआयामी कलाप्रवास वाळू नव्याने भिजवणे

जगातील म्युझियम्स, द्विवार्षिक (बिएंनाले) प्रदर्शनात आणि कलाउत्सव यांना भेट दिल्यानंतर त्यांना समकालीन कलाकृती म्हणजे काय याचा बोध होऊ लागला. ‘सुरुवातीला मला बहुतेक समकालीन कलाकृती निरर्थक वाटत असत,’ ते कबूल करतात. ‘परंतु मी स्वतः ते पाहून ठरवायचं असा निर्णय घेतला.’ त्याच वेळी समुद्र हा त्यांच्या जीवनाचा मध्यवर्ती केंद्र होताच. ते वडिलांसोबत तासनतास किनाऱ्यावर चकरा मारायचे. त्यांच्या वडिलांनी त्यांना वैश्विक दृष्टिकोन तर दिलाच शिवाय त्यांचे कलेविषयीचे विचार घडवले. ‘‘माझे वडील क्षितिजाच्या दिशेने बोट करून सांगायचे, ‘तुमचं मन हे त्या क्षितिजाप्रमाणे विशाल व्हायला हवं.’’ दुसरा एक धडा त्यांच्या अधिकच लक्षात राहिला. किनाऱ्यावर येऊन आदळणाऱ्या लाटा पाहून वडील म्हणायचे, बहुतेक लाटा आधीच ओल्या झालेल्या वाळूपर्यंतच पोहोचतात, पण काही वेळा ओल्या न झालेल्या वाळूपर्यंत देखील त्या पोहोचतात. ‘‘कोणत्याही सृजनात्मक प्रकारात वाळू नव्याने ओली व्हायला हवी.’’ असे वडील सांगायचे.

सागर आणि कलानिर्मिती

गेल्या वीस वर्षांत सुबोध केरकर यांनी अनेक भव्य इन्स्टॉलेशन्स उभारली आहेत. त्यांत तिथले मच्छीमार, कामगार आणि किनारपट्टीतील इतर लोक यांचा सहभाग आहे. ड्रोनच्या साहाय्याने जेव्हा वरून किनारपट्टीवरील हालचाली टिपल्या जातात, तेव्हा ती सामान्य जनता सागराच्या लाटा आणि भरती-ओहोटी याचे रूप घेतात. ‘‘रंगभूमीवरील हा नाट्यप्रयोगही नाही आणि हे नृत्यही नव्हे! ते दाखवण्यामागे मानवी समाज आणि सागर यांचे अतूट नाते आहे.’’ एका कलाकृतीमध्ये डझनवारी माणसे किनाऱ्यावर हिंडताना जाणीवपूर्वक लाटांचा आभास निर्माण करतात. वरून हे आकार अमूर्त आणि प्राथमिक स्वरूपाचे दिसतात. ‘‘सागराच्या लाटा फक्त पत्थर आणि वाळू यातून आकार निर्माण करत नाहीत, तर सांस्कृतिक जाणिवांवरही परिणाम करतात.’’ भरत बाला हे एक चित्रपट निर्माते आहेत, त्यांनी जेव्हा गोव्याच्या विमानतळावर फोटोग्राफ लावलेले पाहिले, तेव्हा त्यांनी त्यावर सिनेमा करायचे ठरवले. केरकर यांच्या कामात ड्रोन छायाचित्रण हे केंद्रीभूत ठरले.

आता हे सारे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेहमी दाखवले जात असते. वातावरणासंबंधी चळवळीशी त्यांचा दाट संबंध प्रस्थापित झाला आहे. अलीकडेच ‘ग्रीनपीस’ या संस्थेच्या सांगण्यावरून श्रीलंकेत काम सुरू झाले आहे. कलेचा प्रत्यक्ष जीवनसंघर्षाशी संबंध असतो या त्यांच्या आग्रहाला हे धरूनच आहे. ‘कलाकारांनी राजकारण समजून घ्यायला हवं.’ ही त्यांची ठाम धारणा आहे. ‘कला ही फक्त शोभेसाठी नाही.’

गोवा म्युझियमची स्थापना

या त्यांच्या आग्रहाचे एक दृश्यरूप म्हणजे ‘म्युझियम ऑफ गोवा’ची स्थापना. आपल्या देशाची कला ही प्रामुख्याने उच्चभ्रू मंडळीसाठी सीमित आहे, याची जाणीव झाल्याने ही कल्पना सुचली. ‘बहुतेकांना वाटतं की कला ही फक्त श्रीमंतासाठी मर्यादित आहे. सर्वसामान्य जनता आर्ट गॅलरीत पाऊल ठेवायलाही बिचकते.’ हे बदलण्यासाठी केरकर यांनी स्वतःची मालमत्ता विकून पैसे उभे केले आणि त्यात स्वतः भर घालून लोकांच्या विविध शंकाकुशंका, प्रश्‍न याकडे दुर्लक्ष करून म्युझियम उभे केले. ‘सर्वांनी मला मूर्खात काढलं,’ ते सांगतात. आता शेकडो लोक या म्युझियमला रोज भेट देतात. यापैकी बहुतेक तरुण विद्यार्थी, अनेक कुटुंबे आणि कलाकृती विकत न घेणारे असे रसिक असतात. केरकर यांना नेमके हेच हवे आहे. जवळजवळ नव्याण्णव टक्के लोकांना कलाकृती विकत घेण्यात रस नसतो.’ केरकर अभिमानाने सांगतात.

तुकाराम दर्शन

त्यांनी पारंपरिक आर्ट गॅलरीचा मार्ग टाळला आहे. रसिकांपर्यंत त्यांची कला पोहोचण्यासाठी ते इंस्टाग्रामचे साहाय्य घेतात. त्यांचे एक लाख ६८ हजांराहून अधिक फॉलोअर्स आहेत. ते या समाज माध्यमांचा उपयोग स्वतःच्या प्रसिद्धीसाठी करत नाहीत तर कला शिक्षणासाठी करतात. ‘माझ्यासाठी इंस्टाग्राम ही कलाशिक्षणाची सोय आहे.’ त्यांना आपल्या भाषांचे विशेष कौतुक आहे. ‘आपल्या देशात जर कलाशिक्षण रुजायचं असेल, तर ते आपल्या देशी भाषांत मिळायला हवं,’ असा त्यांचा आग्रह आहे. त्यांचे धोरण ते एका संस्मरणीय वाक्यात सांगतात. ‘मी त्यांना तुकारामपद्धती म्हणतो.’ सतराव्या शतकातील मराठी संतकवी तुकारामांप्रमाणेच, केरकर यांचा विश्वास आहे, की गहन आणि गंभीर विचार मांडण्यासाठी भाषा क्लिष्ट किंवा दुर्बोध असण्याची गरज नसते. “तुकारामांनी कधीच दर्जा कमी केला नाही,” ते म्हणतात. “पण त्यांनी सर्वसामान्य माणसांपर्यंत संवाद पोहोचवला.” सुबोध केरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू - डॉक्टर, व्यंगचित्रकार, चळवळीचा सूत्रधार, म्युझियमचा संस्थापक आणि कलावंत या सर्वांमागे एक निश्चित प्रेरणा आहे, उच्चभ्रू समाजात अडकलेली कला सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवायची.

आणि या सर्वांमागे सागराची गाज आहेच.
View this post on Instagram