ॲड. रोहित एरंडे, कायद्याचे अभ्यासक
एखाद्या व्यक्तीला अपघात झाल्यानंतर वैद्यकीय उपचार, त्यासाठीचा खर्च, विमा पॉलिसीतून खर्च मिळविण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि अपघात भरपाई मिळण्यासाठी न्यायालयात माराव्या लागणाऱ्या चकरा अशा दिव्यातून जावे लागते. ज्यांच्यावर दुर्दैवाने अशी वेळ असेल, त्यांनाच यातील वेदना समजतील. अशाच एका प्रकरणात मोटार अपघात भरपाई न्यायाधिकरणाकडून (MACT) मिळणाऱ्या नुकसानभरपाईतून आरोग्य विमा (Mediclaim) पॉलिसीमधून मिळालेली रक्कम वजा करता येईल का? असा महत्त्वपूर्ण प्रश्न नुकताच सर्वोच्च न्यायालयाने निकालात काढला.
एका अपघात झालेल्या व्यक्तीने मोटार अपघात भरपाई न्यायाधिकरणासमोर नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला. त्या दाव्यात उत्पन्नात झालेले नुकसान, भविष्यातील उत्पन्नाच्या संधींचे नुकसान, विशेष आहार, प्रवास खर्च; तसेच वैद्यकीय खर्च यांसारख्या बाबींचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याच वेळी, याच वैद्यकीय खर्चांसाठी आरोग्य विम्यासाठी विमा कंपनीकडे दावा करण्यात आला आणि ती रक्कमही मिळाली. मुंबई उच्च न्यायालयात हे प्रकरण आल्यानंतर, उच्च न्यायालयाचेच परस्परविरोधी निकाल असल्याचे निदर्शनास आल्याने हे प्रकरण तीन सदस्यीय पूर्णपीठाकडे गेले. या पीठाने अशी रक्कम वळती करता येणार नाही, असा निकाल दिला आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले.
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयसर्वोच्च न्यायालयाच्या न्या. संजय करोल आणि न्या. विपुल पांचोली यांच्या खंडपीठाने या प्रश्नावर विविध उच्च न्यायालयांच्या वेगवेगळ्या खंडपीठांनी दिलेल्या परस्परविरोधी निकालांची यादीच निकालात उद्धृत केली आणि या महत्त्वाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उत्तर देण्याची वेळ आली असल्याचे नमूद केले.
अपघात नुकसानभरपाई आणि आरोग्य विमा अशा दोन्ही रकमा मिळणे म्हणजे तक्रारदाराचा दुहेरी फायदा आहे, असा युक्तिवाद विमा कंपनीने केला, तर विमा रक्कम मिळणे आणि कायदेशीर हक्क म्हणून नुकसानभरपाई मिळणे या दोन्ही स्वतंत्र गोष्टी असून, त्याचा ‘सेट-ऑफ’ घेता येणार नाही, असा युक्तिवाद तक्रारदाराने केला. यावर सर्वोच्च न्यायालयाने आरोग्य विम्यातून मिळालेली रक्कम अपघात नुकसानभरपाईतून वजा करता येणार नाही, असा स्पष्ट निकाल दिला.
मोटार वाहन कायद्यासारख्या सामाजिक कायद्याखाली मिळणारी वैधानिक भरपाई, आणि आरोग्य विम्यासारख्या एका करारामधून मिळणारा लाभ हे दोन्ही स्वतंत्र आहेत आणि एकमेकांवर अवलंबून नाहीत. आरोग्य विम्यासाठी एखादी व्यक्ती वर्षांनुवर्षे प्रीमियम भरते आणि त्यामुळे अशा व्यक्तीस वेळ आल्यावर त्या पॉलिसीचे पैसे मिळणे गरजेचे आहे. अपघात नुकसानभरपाईतून विम्याची रक्कम वजा केली, तर दोषी वाहनचालकाला किंवा विमा कंपनीला अनुचित फायदा होईल. एकाच कारणासाठी दोनवेळा नुकसानभरपाई मिळणे चुकीचे आहे. परंतु, दोन्ही कारणांचा पायाच वेगळा असेल, तर हा नियम लावता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या निर्णयाचा फायदा अनेक पिडीत लोकांना होणार आहे, यात शंका नाही.
(संदर्भ : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. वि. डॉली सतीश गांधी-एस.एल.पी. १८२६७/२०२५, निकाल : १५ मे २०२६)