Ancient Heritage Discovery : भुदरगड तालुक्यात सापडला मध्ययुगीन काळातील दुर्मीळ ठेवा; ज्योतिर्लिंग मंदिराबाहेर आढळल्या गूढ शिळा, शेकडो वर्षांपूर्वीचा इतिहास उजेडात
esakal June 08, 2026 11:45 AM

गारगोटी (कोल्हापूर) : नाधवडे (ता. भुदरगड) येथे मध्ययुगीन कालखंडातील समाजजीवन, शौर्य आणि सांस्कृतिक परंपरेची साक्ष देणारा दुर्मीळ पुरातन ठेवा उजेडात आला आहे. ग्रामदैवत असलेल्या जोतिर्लिंग मंदिर समूह आणि मरगुबाई मंदिर परिसरात आढळलेल्या गो-संरक्षक विरगळ, सतीशिळा, सर्पशिळा आणि विविध वीरगळींमुळे लक्ष वेधले (Ancient Virgal at Jyotirling Temple) आहे.

पर्यावरण मित्र अवधूत पाटील यांनी विनायक पाटील यांच्या सहकार्याने केलेल्या पाहणीत पशुधनाचे संरक्षण करताना वीरमरण आलेल्या अज्ञात योद्ध्याच्या स्मरणार्थ उभारलेला दुर्मीळ गो-संरक्षक विरगळ शोधून काढला. या विरगळावरील कोरीव शिल्पांत गोधन, त्यावर हल्ला करणारे शत्रू आणि गोधनाच्या रक्षणासाठी लढणारा वीर योद्धा यांचे प्रभावी चित्रण दिसून येते.

मध्ययुगीन काळात गुरांना संपत्तीचे प्रतीक मानले जात असल्याने त्यांचे संरक्षण करताना प्राणार्पण करणाऱ्या वीरांच्या स्मृती जपण्यासाठी अशा विरगळी कोरण्याची परंपरा होती. बारवे येथील १२ ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील गो-संरक्षक विरगळीनंतर नाधवडेत आढळलेल्या दोन गो-संरक्षक विरगळी विशेष महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

Panhala Tourism Tax : पन्हाळागडावर पर्यटकांची उघड लूट? पर्यटन कराच्या नावाखाली वर्षाकाठी 5 ते 7 लाखांचा घोळ; 'या' गोष्टीमुळे संशय वाढला!

नाधवडे येथील दक्षिणाभिमुख जोतिर्लिंग मंदिर परिसरात आठ विरगळी, एक सतीशिळा, एक सर्पशिळा आणि एक दुर्मीळ गो-संरक्षक विरगळ आढळून आली आहे. चाफ्याच्या झाडाखाली, मंदिराबाहेरील पिंपळाच्या पारावर आणि मरगुबाई मंदिर परिसरातही अनेक वीरस्मारके अस्तित्वात आहेत.

विरगळींवरील कोरीव शिल्पांमधून गावाचे संरक्षण, सीमांचे रक्षण, गड-किल्ल्यांची सुरक्षा, हिंस्र प्राण्यांशी संघर्ष, गोधनाचे संरक्षण आणि युद्धभूमीवरील शौर्य, अशा अनेक ऐतिहासिक घटनांचे दर्शन घडते. या शिळा त्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाचे जिवंत दस्तऐवज असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. मंदिर परिसरात आढळलेली सतीशिळाही विशेष लक्षवेधी आहे.

Jalna-Jalgaon Railway : अजिंठा लेणी रेल्वे प्रकल्पाबाबत मोठी अपडेट! शेतकऱ्यांकडून तब्बल 250 हरकती दाखल; मार्गाचे काम कुठपर्यंत आले?

नाधवडे येथे मध्ययुगीन कालखंडापासून उभ्या असलेल्या विरगळी आणि सतीशिळा हे गावाचे अमूल्य वैभव आहे. या केवळ दगडी रचना नसून, त्या काळातील समाजजीवन, श्रद्धा, शौर्य आणि संस्कृतीचे जिवंत प्रतिबिंब आहेत. हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी विरगळी समूह स्मारक उभारण्याची गरज आहे.

-अवधूत पाटील, पर्यावरण मित्र

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.