एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत अन् … बच्चू कडूंचं खळबळजनक विधान
Tv9 Marathi June 08, 2026 04:45 PM

शिवसेनेचे आमदार बच्चू कडू हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांनी अनेकदा भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. नुकताच त्यांनी भंडारा येथे बोलताना देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. त्यांनी शेतकरी आत्महत्येचा प्रश्न उपस्थित करत सरकारवर निशाणा साधला. तसेच कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास खपवून घेणार नाही असे विधान देखील केली.

“हाच विदर्भ एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवेल”

आमदारबच्चू कडू यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री पदावर पाहण्याची आपली तीव्र इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले की, राज्याचा मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा असावा, ही प्रत्येक शिवसैनिकाची प्रामाणिक भावना असू शकते. तसेच, ‘देवाभाऊंना’ (देवेंद्र फडणवीस) बढती मिळावी आणि शिंदेंकडे राज्याचे नेतृत्व यावे, अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवली. पक्षाच्या प्रचारासाठी गेल्या १५ ते २० दिवसांपासून आपण विदर्भात गावोगावी फिरून लोकांशी संवाद साधत आहोत. केवळ चार दिवसांत आपण २० सभा घेतल्याचे सांगत, “हाच विदर्भ एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसवेल,” असा ठाम विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे.

“50 हजार कर्ज आहे आणि व्याज दोन लाख”

नुकताच बच्चू कडू यांनी अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नाही म्हणणाऱ्या सरकारला कर्जमाफीची तारीख जाहीर करावी लागली. हे शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे शक्य झाले. दोन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर झालं.. ज्याच्याकडे अडीच लाख, तीन लाख आहे त्यांना माफ होणार नाही. OTS केल्यामुळे 50 हजार कर्ज आहे आणि व्याज दोन लाख आहे. मुख्यमंत्री यांना विनंती करतो की, महात्मा फुले कर्जमाफी सारखी कर्जमाफी करावी. सतत दोन वर्षे नियमित कर्ज भरले तरच प्रोत्साहन निधी देणार, पण हे सगळ्यांना द्यावे आणि ते 50 हजार नाहीतर एक लाख रुपये द्या.

पुढे त्यांनी हमीभाव मिळत नाही तोपर्यंत हे प्रोत्साहन निधी देत राहावं अशी मागणी आहे असे म्हटले. जुनी कर्जमाफी झाली त्यात अजूनही अनेक शेतकऱ्यांना ती मिळाली नाही आणि प्रोत्साहन निधी पण मिळाला नाही. OTS करतांना दोन वर्षांची अट रद्द करावी. दिव्यांग बांधवांना सरसकट कर्जमाफी करावी. मी शिवसैनिक आहे. पण आमच्या डोक्यातुन शेतकरी आणि दिव्यांग जाणार नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहू. मागण्या मान्य नाही झाल्या तर लवकरच पुढच्या आंदोलनाची तारीख जाहीर करू असे देखील बच्चू कडू म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.