शिंदेंच्या टारगेटवर आता कोण? ऑपरेशन टायगरबाबत संजय शिरसाट यांचा मोठा दावा, राजकारणात खळबळ
Tv9 Marathi June 08, 2026 11:45 PM

शिवसेना शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरची चर्चा अजूनही अधून मधून होत असते. दरम्यान यावर बोलताना आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ऑपरेशन टायगर ही एक मोठी प्रोसेस आहे, यादरम्यान जेव्हा टार्गेट समोर येईल तेव्हा एकनाथ शिंदे यांच्या बंदुकीतून गोळी निघेल, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. दरम्यान संजय शिरसाट यांच्या या विधानानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या टारगेटवर नक्की कोण आहे? यावरून चर्चा सुरू झाली आहे. ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. दरम्यान ऑपरेशन टायगर राबवण्यात येणार की नाही? हे वेळ सांगेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया 

दरम्यान राष्ट्रवादीच्या वाट्याची राज्यभसेची जागा ही छगन भुजबळ यांनाच मिळणार अशी जोरदार चर्चा सुरू होती. भुजबळांची देखील इच्छा होती. मात्र ऐनवेळी भुजबळांचा पत्ता कट झाला, त्यामुळे भुजबळांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर देखील शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भूजबळ का नाराज झाले याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही, राष्ट्रवादी  महायुतीचा घटकपक्ष आहे. कुणाला ऊमेदवारी दिली कोण नाराज आहे?  हे ते ठरवतील
त्यांच्या कुस्तीचा डाव ते कुणावर टाकतात? हे भविष्यात कळेल, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज दिल्लीमध्ये महाविकास आघाडीची बैठक पार पडली, या बैठकीला उद्धव ठाकरे प्रत्यक्ष उपस्थिती नव्हते. त्यांनी ऑनलाईन ही बैठक अटेंड केली. यावर बोलताना शिरसाट यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे यांना इंडिया आघाडीत राहायचं नाहीये, त्यांची ही ठरलेली नीती आहे. त्यामुळेच त्यांनी व्हीसीच्या माध्यमातून बैठक अटेंड केली.  हातचं राखणं ही पद्धत शिवसेना ठाकरे गटाने राबवली आहे, असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी काय दिवे लावले हे त्यांनाच माहिती आहे, असाही टोला यावेळी शिरसाट यांनी लावला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.