Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य
esakal June 12, 2026 02:45 AM

सांगली - हमाल नेते, सांगली बाजर समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांच्या नातवाचा घरात घुसून गोळ्या घालून आज निर्घृण खून करण्यात आला. हमाल ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंड निलेश गडदे याने साथीदारांसह हे कृत्य केले. वेदांत मारूती बंडगर (वय १४) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणाने संजयनगरसह सांगलीत खळबळ उडाली आहे. सायंकाळी साडे सहाच्या सुमारास अभयनगर एसटी कॉलनीत ही घटना घडली. एका निष्पाप मुलाचा संशयितांनी गोळी झाडून खून केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिस फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला.

दरम्यान, गडदे याने सन २०२० मध्ये कुपवाडमधील कामगार नेते दत्ता पाटोळे यांच्या खून केला होता. त्यातून त्याची जामिनावर सुटका झाली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याच्यासह साथीदारांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण तातडीने चार पथके रवाना झाली आहेत, असे अधीक्षक तुषार दोशी यांनी पत्रकारांना सांगितले.

पोलिसांनी दिलेली व घटनास्थळावर मिळालेली माहिती अशी, मिरज तालुक्यातील रेल्वेच्या मालधक्क्याच्या कामावरून दोन गटात काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या कामाचा ठेका सध्या लक्ष्मण पांडुरंग खरात (वय-४१, रा. बाज, ता. जत) यांच्याकडे आहे. खरात यांनी हे काम सोडावे म्हणून संशयित निलेश डदे (मूळ रा. हमालवाडी, सध्या रा. कुंभारी, ता. जत) याने दबाव आणला होता.

काल सायंकाळी सातच्या सुमारास गडदे हा दोन साथीदारांसह खरात यांच्या घरात गेला. खरात घरात नसल्यामुळे त्यांची पत्नी रंजना खरात यांना धमकावले. ‘पतीला रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्याचे काम सोडण्यास सांग, अन्यथा दहा लाख रुपये द्यावेत, नाहीतर खरात यांना ठार मारू’ अशी धमकी दिली.

खरात यांच्या घरात घुसून धमकावल्याची माहिती मिळताच हमाल पंचायतीचे नेते बाळासाहेब बंडगर हे जत येथे गेले. गडदे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी हमाल मोठ्या संख्येने गोळा झाले होते. दुपारी साडे बाराच्या सुमारास पोलिस ठाणे परिसरात दोन गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण झाला होता.

तेव्हा संतप्त हमालांनी गडदे समर्थकांच्या चारचाकीवर दगडफेक केली. त्यामुळे गडदे चिडला. बाळासाहेब बंडगर यांच्यामुळे हा प्रकार घडल्याच्या रागातून तो सायंकाळी सांगलीत आला. तीन साथीदारांना घेऊन काळ्या रंगाच्या जीपमधून तो संजयनगरजवळील अभयनगर येथील एसटी कॉलनी परिसरात बंडगर यांचे घर शोधत आला.

बंडगरांचे घर हेच का?

सायंकाळी साडे सहाच्या सुमारास बंडगर यांच्या बंगल्यासमोर आल्यानंतर गडदे हा चारचाकीतून खाली उतरला. त्याच्या हातात पिस्तुल होते. गडदे याने बाळासाहेब बंडगर यांचे घर हेच का, असे बाळासाहेबांच्या भावाला विचारले. त्यानंतर गडदे याने पिस्तूल काढत दहशत माजवली. बंडगर यांचे भाऊ बंगल्याच्या मागील बाजूला पळाले. त्यावेळी बंगल्याच्या पोर्चमध्ये बाळासाहेब यांचा मुलगा, बाजार समितीचे संचालक मारूती बंडगर यांचा मुलगा वेदांत हा मोबाईल बघत होता.

गडदे याने वेदांतवर पिस्तुल रोखून त्याच्या उजव्या डोळ्यात गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून बंडगर यांच्या घरातील महिला बाहेर आल्या. तोपर्यंत गडदे हा साथीदारांबरोबर निघून गेला. वेदांत याच्यावर गोळी झाडल्याचे लक्षात येताच तत्काळ त्याचे वडील मारूती व चुलते बंगल्यात आले. जखमी वेदांतला तत्काळ सिव्हीलमध्ये दाखल केले. परंतू रक्तस्त्रावाने त्याचा मृत्यू झाला.

चार पथके रवाना

गोळीबाराची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक कल्पना बारवकर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजीव झाडे, संजयनगरचे निरीक्षक सतीश कदम, मुकुंद कुलकर्णी, सहायक निरीक्षक आनंदराव घाडगे घटनास्थळी दाखल झाले. संशयित हल्लेखोर गडदे याच्या शोधासाठी तातडीने चार पथके रवाना केली.

संपवायचं होतं बाळासाहेबांना

बाळासाहेब बंडगर हे हमालांचे नेते असल्याने जतमध्ये गेले होते. त्यांनी गडदे याच्याविरोधात कारवाईसाठी पोलिस ठाण्यात धाव घेतली होती. त्यामुळे चिडलेला गडदे हा बाळासाहेबांना संपवण्यासाठी सांगलीत आला होता. बाळासाहेब सांगलीत असल्याची माहिती त्याला मिळाली होती. त्यामुळे ते सांगली आला. बंगल्या अंगणात मोबाईलवर गेम खेळ बसला होता. त्यांच्या आजोबांचा राग त्या निष्पाप वेदांतवर काढण्यात आला. कुटुंबियांचा लळा त्याच्यावर होता. त्याच्या जाण्याने बंडगर कुटुंबिला मोठा धक्का बसला. घरात त्याचे नाव घेत कुटुंबियांना हंबरडा फोडला. परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.

सांगली बंदी असताना कृत्य

कुपवाडमधील राष्ट्रवादीचा युवक जिल्हा उपाध्यक्ष दत्ता पाटोळे यांचा जुलै २०२० मध्ये निर्घृण खून झाला होता. या खुनातील मुख्य संशयित निलेश गडदे हा आहे. या खून प्रकरणात तो काही दिवसापूर्वी जामिनावर मुक्त झाला होता. त्याला महापालिका क्षेत्रात प्रवेश बंदी होती. तरीही त्याने हे कृत्य केल्याने जिल्हा हदरला आहे.

हमाल ते संचालक

बाळासाहेब बंडगर हे हमाल गटातून २००७ ते २००८ बाजार समितीत संचालक झाले. तेथून त्यांच्या प्रवास हमाल ते हमाल नेता असा सुरू झाला. हमालासाठी अनेक चांगली कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळेच त्यांना हमालांची साथ नेहमीच राहिली. सध्या त्यांचा चिरंजीव मारूती बंडगर हे संचालक आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.