पूर्वोत्तर भारतातून मोठी बातमी समोर आली आहे. आसामधील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रात्री सुमारे 9:10 वाजता झालेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी नोंदवली गेली. अनेक भागांत सौम्य धक्के जाणवल्याने नागरिक घराबाहेर पडले. या भूकंपामुळे सगळीकडे भीतीचे वापावरण पसरले आहे. सुदैवाने, अद्याप कोणत्याही प्रकारच्या जीवित किंवा वित्तहानीची माहिती समोर आलेली नाही.
आसाममध्ये पुन्हा भूकंपसमोर आलेल्या माहितीनुसार, याआधी रविवारी उशिरा रात्रीही राज्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी आसाम, मेघालय आणि ईशान्य भारतातील इतर भागांतही तीव्र कंपने जाणवली होती. भूतानजवळ रिश्टर स्केलवर 5.7 तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याचे केंद्र असमच्या काही भागांपासून सुमारे 252 किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे ईशान्य भारतातील अनेक भागांत भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यानंतर आता पुन्हा 4 दिवसांनी या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
ईशान्य भारतात वारंवार भूकंप का होतात?ईशान्य भारतात वेळोवेळी लहान-मोठे भूकंप होत असतात. यामागे या प्रदेशाची भौगोलिक आणि भूगर्भीय रचना कारणीभूत आहे. वैज्ञानिकांच्या मते, ईशान्य भारत पृथ्वीवरील अत्यंत सक्रिय टेक्टॉनिक प्लेट्सच्या संगमाजवळ स्थित आहे, जिथे सतत भूगर्भीय हालचाली होत असतात. याचा परिणाम पृष्ठभागावर जाणवतो, त्यामुळे भूकंप होतो.
भारतीय प्लेटची यूरेशियन प्लेटशी टक्करभारतीय टेक्टॉनिक प्लेट उत्तर दिशेकडे सरकत असून ती यूरेशियन प्लेटला धडकत आहे. कोट्यवधी वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेमुळे हिमालय पर्वतरांगांची निर्मिती झाली. ही प्रक्रिया आजही सुरू आहे. या दोन प्लेट्समधील ताणतणाव वेळोवेळी कमी जास्त होतो आणि त्यामुळे भूकंप होतात.
आसामखाली अनेक सक्रिय फॉल्ट लाईन्सआसाम हे राज्य भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानले जाते. या राज्याच्या खाली आणि आसपास अनेक सक्रिय फॉल्ट लाईन्स (भूगर्भीय तडे) आहेत. या भागांमध्ये खडकांचे थर एकमेकांच्या तुलनेत सरकत असतात. जेव्हा या ठिकाणी दबाव वाढतो, तेव्हा मोठ्या प्रमाणात ऊर्जा मुक्त होते आणि त्यामुळे पृथ्वी हादरते. अशीच परिस्थिती ईशान्य भारतातील मणिपूर, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यांमध्येही आढळते. त्यामुळे या भागांमध्ये भूकंपाचा धोका कायम असतो.