केन विल्यम्ससनची क्रिकेटमधून एक्झिट अन् किंग कोहलीची जिगरी दोस्तासाठी पोस्ट; म्हणाला, 'प्रतिस्पर्धी ते मित्र हा प्रवास खूपच खास राहिला, पण त्यापेक्षाही...'
जयदीप मेढे June 13, 2026 12:43 AM

Virat Kohli on Kane Williamson: न्यूझीलंडच्या महान फलंदाजांपैकी एक मानल्या जाणाऱ्या केन विल्यमसनने आपल्या 16 वर्षांच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला आज निरोप दिला. आपल्या देशासाठी 378 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, अनेक विक्रम प्रस्थापित केले आणि आपल्या नम्रता व साधेपणाने संपूर्ण क्रिकेट जगताचा आदर मिळवला. विल्यम्ससनच्या निवृतीनंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने दोघांच्या नात्यांमधील उलघडा केला आहे. कोहली म्हणाला, न्यूझीलंडचा महान फलंदाज केन विल्यमसनसोबतच्या मैत्रीला खूप महत्त्व देतो. खेळासाठी समर्पित आयुष्यभराच्या कामगिरीचा आनंद घेण्याची हीच वेळ असल्याचेही त्याने नमूद केले. विल्यमसनने यापूर्वी 2025 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. कोहली आणि विल्यमसनची मैत्री 2008 च्या 19 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेदरम्यान सुरू झाली. तेव्हापासून हे दोन दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये अनेक वेळा एकमेकांसमोर आले आहेत. आयपीएलच्या सुरुवातीपासून कोहली रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा भाग आहे, तर विल्यमसन सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्सकडून खेळला आहे.

प्रतिस्पर्धी ते मित्र असा गेल्या काही वर्षांतील हा प्रवास..

कोहलीने सोशल मीडियावर लिहिले, "प्रतिस्पर्धी ते मित्र असा गेल्या काही वर्षांतील हा प्रवास खूपच खास राहिला आहे. इतके दिवस तुला फलंदाजी करताना पाहणे आणि तुझ्याविरुद्ध खेळणे हा एक आनंददायी अनुभव होता. पण त्याहूनही अधिक, मी आपल्या मैत्रीला आणि खेळ व जीवन या दोन्हीवरील आपल्या सामायिक विचारांना महत्त्व देतो." तो पुढे म्हणाला, "आपल्या भेटीगाठी आणि संभाषणांचे ते क्षण मी नेहमीच जपून ठेवीन. तुला नेहमीच खूप खूप शुभेच्छा. तू क्रिकेटला तुझे सर्वोत्तम दिले आहेस. आता तू तुझ्या यशाचा आनंद घेण्यास पात्र आहेस. मित्रा, हा एक अद्भुत प्रवास होता. आयुष्यातील नव्या सुरुवातीसाठी खूप खूप शुभेच्छा."विल्यमसनच्या कर्णधारपदाखाली न्यूझीलंडने दोनदा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक अंतिम सामना खेळला, तीनदा उपांत्य फेरी गाठली आणि 2021 मध्ये आपले पहिले विश्व कसोटी चॅम्पियनशिप विजेतेपद पटकावले. 2015 मध्ये 'आयसीसी वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू' आणि 2019 मध्ये 'आयसीसी वर्षातील सर्वोत्कृष्ट कसोटी क्रिकेटपटू' म्हणून गौरविण्यात आले. आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनीही विल्यमसनचे त्याच्या शानदार कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले. त्यांनी त्याच्या नम्रतेची आणि नेतृत्वगुणांची प्रशंसा केली आणि त्याला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विल्यमसनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19,346 धावा

जय शाह यांनी लिहिले, "केन विल्यमसनचे त्याच्या अद्भुत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल अभिनंदन. तुझी कारकीर्द उत्कृष्ट कामगिरी, नम्रता आणि उत्तम नेतृत्वाचे प्रतीक आहे. 2019 विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून आणि 2021 च्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये न्यूझीलंडला ऐतिहासिक विजय मिळवून देणारा कर्णधार म्हणून कामगिरी क्रिकेटच्या इतिहासात कायमची कोरली जाईल." 35 वर्षीय विल्यमसनच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19,346 धावा आहेत. तो न्यूझीलंडचा सर्वकालीन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून आपल्या कारकिर्दीचा शेवट करत आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 33 शतके आणि सहा द्विशतकांसह 9,500 हून अधिक धावा केल्या आहेत. तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून त्याच्या नावावर 48 शतके आणि सहा द्विशतके आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.