रेल्वे ट्रेनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबद्दल नेहमीच प्रश्न केले जातात. त्यामुळे रेल्वेची खानपान सेवा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसीने ( IRCTC ) आता अधिकृत प्लॅटफॉर्म्सद्वारे जेवण बुक करण्याचा सल्ला दिला आहे. रेल्वेने ई-कॅटरिंग सेवेचा आवाका वाढवण्याबरोबरच अनेक खाजगी प्लॅटफॉर्मना देखील या व्यवसायात उतरवले आहे. मात्र, कंपनीने प्रवाशांना सावध करीत सर्वच कंपन्या अधिकृत नसल्याचे म्हटले आहे.
आयआरसीटीसीच्या मते काही प्लॅटफॉर्म विना परवानगी ई-कॅटरिंग सेवा देत होते. आणि रेल्वेच्या नियमांचे पालन करत नव्हते. यामुळे प्रवाशांना निकृष्ठ अन्न मिळाल्यावर, बिला संदर्भात वाद आणि पैशांचा वाद तसेच डेटा सुरक्षेसारख्या समस्यांचा करावा लागू शकतो. त्यामुळे आयआरसीटीसीने याबाबतीत कठोर धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
IRCTC ने १८ फेब्रुवारी २०२६ मध्ये सर्वात आधी कायदेशीर नोटिस जारी केली होती. त्यानंतर १६ मार्च आणि ११ एप्रिल २०२६ रोजी अनेक अनधिकृत फूड डिलिव्हरी ऑपरेटरांच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या. विशेष तपासणी मोहिमेत अनेक प्लॅटफॉर्म्सचा थांगपत्ता लागला जे रेल्वेच्या परवानगी शिवाय ई-कॅटरींगची सेवा पुरवत होते. नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणात त्यांच्यावर आता रितसर कारवाई सुरु केली आहे.
IRCTC ने कारवाई करताना रेलरेस्ट्रो (RailRestro), रेलमित्र ( RailMitra ), ट्रॅव्हलखाना ( TravelKhana ), ट्रेन्सकॅफे ( TrainsCafe ), डीआयबी रेल ( DIBRail ), रेलफूड ( RailFood ), कमेससम ( ComesSum ), ट्रॅव्हलर फूड ( TravelerFood ), फूड ऑन ट्रॅक डॉट इन ( FoodOnTrack.in ), ई कॅटरिंग ऐप ( eCatering App ), खाना ऑनलाईन ( KhanaOnline ), ट्रेनवे ( TrainWay ), रेलमील ( RailMeal ) आणि ट्रेनमेन्यू ( TrainMenu ) सारख्या प्लॅटफॉर्मवर कारवाई केली आहे.
प्रवाशांना काय सल्ला ?आयआरसीटीसीने प्रवाशांना आवाहन केले आहे की केवळ अधिकृत ई-कॅटरिंग वेबसाईट, फूड ऑन ट्रॅक (Food on Track) मोबाईल ऐप वा रेल्वे द्वारा अधिकृत फूड पार्टनर्सद्वारे जेवणाची ऑर्डर करावी. यामुळे फूड हायझीन, सुरक्षित पेमेंट, योग्य बिल आणि ग्राहक मदत सारख्या सुविधा मिळू शकतील.