मंचर : जन्मजात कर्णबधिर मुलांना ऐकण्यास व बोलण्यास सक्षम करण्यासाठी मंचर येथे 'स्वरनाद' ही विशेष पूर्व प्राथमिक शाळा १५ जूनपासून सुरू होत असून, मोरडे फूड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कॉक्लिआ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. ३ ते ६ वर्षे वयोगटातील कर्णबधिर मुलांना या शाळेत विशेष वाचा-भाषा प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मंचर येथे आयोजित पत्रकार परिषदेत कॉक्लिआ पुणेचे डॉ. अविनाश वाचासुंदर यांनी ही माहिती दिली. यावेळी मोरडे फूड्स प्रा. लि.चे संचालक किशोर मोरडे, व्यवस्थापक अजित घुले, वित्त व्यवस्थापक मदन देशपांडे, प्रताप पाटील, रक्षा देशपांडे, अभिलाषा अग्निहोत्री, पल्लवी शर्मा, तृप्ती कोहिनकर तसेच मोरडे फूड्स आणि कॉक्लिआ पुणेचे पदाधिकारी, अधिकारी व पालक उपस्थित होते.
सर्वसामान्य मुलांच्या पूर्व प्राथमिक शिक्षणाप्रमाणेच या शाळेत शैक्षणिक अभ्यासासोबत वाचा-भाषा प्रशिक्षणावर विशेष भर दिला जाणार असून, त्यासाठी प्रशिक्षकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. खेड, जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर तालुक्यांमध्ये दरवर्षी सुमारे दोन ते पाच हजार बालकांचा जन्म होतो. त्यापैकी ३० ते ५० बालके कर्णबधिर असण्याची शक्यता असल्याचे डॉ. वाचासुंदर यांनी सांगितले.
अंतर्कर्णातील 'कॉक्लिआ' या भागातील दोषामुळे मुलांना ऐकू येत नाही आणि परिणामी त्यांना बोलताही येत नाही. त्यामुळे शिक्षण, रोजगार आणि व्यवसायाच्या संधींपासून ही मुले वंचित राहतात. मात्र लवकर निदान होऊन श्रवणयंत्र अथवा कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सहा वर्षांच्या आत योग्य वाचा-भाषा प्रशिक्षण मिळाले, तर ही मुले सर्वसामान्य मुलांप्रमाणे बोलू शकतात. मानवी मेंदूची ऐकून बोलणे शिकण्याची क्षमता सहाव्या वर्षापर्यंत सर्वाधिक असल्याने या वयात प्रशिक्षणाला विशेष महत्त्व आहे.
विशेष शिक्षकांच्या अभावामुळे अनेक मुलांना श्रवणयंत्र किंवा कॉक्लिअर इम्प्लांटनंतरही आवश्यक प्रशिक्षण मिळत नसल्याने ती दिव्यांग राहण्याची शक्यता वाढते. ही बाब लक्षात घेऊन मोरडे फूड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि कॉक्लिआ पुणे यांनी मंचर येथे ही विशेष पूर्व प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
परिसरातील जन्मजात कर्णबधिर मुलांच्या पालकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मोरडे फूड्स प्रा. लि. आणि कॉक्लिआ पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी रक्षा देशपांडे (मो. ९९२३२८९८४४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले. आभार प्रदर्शन अजित घुले यांनी केले. कार्यक्रमाची व्यवस्था मोरडे फूड्स प्रा. लि.च्या अधिकाऱ्यांनी पाहिली.
समाजोपयोगी उपक्रमांना मोरडे फूड्सचे प्राधान्य
हर्षल मोरडे आणि किशोर मोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोरडे फूड्स प्रा. लि.च्या माध्यमातून सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात असून, भविष्यातही अशाच प्रकारचे भरीव कार्य सुरू ठेवण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.