मोठी बातमी! रेश्मा काळे थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला, जळगावमधील बंडखोरीबाबत सर्वात मोठी अपडेट
Tv9 Marathi June 13, 2026 02:45 AM

राज्यातील विधान परिषद निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. जळगावची जागा भाजपला सुटली आहे, मात्र या ठिकाणावरून शिवसेनेच्या रेश्मा काळे यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर रेश्मा काळे नॉट रिचेबल असल्याचे वृत्त समोर आले होते. अशातच आता काळे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असल्याचे समोर आले आहे. या भेटीचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या भेटीत नेमकं काय घडलं याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रेश्मा काळे एकनाथ शिंदेंच्या भेटीला

जळगाव विधान परिषद निवडणुकीतील शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. रेश्मा काळे यांच्यासोबत शिवसेना शिंदे गट महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता माळी यांचे देखील उपस्थिती होत्या. यावेळी शिंदे आणि काळे यांच्यात जळगाव विधान परिषद निवडणुकीतून माघार घेत महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

उद्या माघार घेण्याची शक्यता

रेश्मा काळे यांच्या बंडखोरीमुळे महायुतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आता एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर उद्या जळगाव मध्ये मंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत रेश्मा काळे यांच्या निवडणुकीतून जाहीर माघारीची शक्यता वर्तवली जात आहे. रेश्मा काळे आज दिवसभर नॉट रिचेबल होत्या, त्यानंतर आता त्यांचे एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे फोटो समोर आले आहेत. आता या भेटीनंतर काळे काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, जळगाव विधान परिषद मतदारसंघात भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी अपक्ष बंडखोरी केल्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. गिरीश महाजन आणि इतर नेते रेश्मा काळे यांच्या माघारीसाठी प्रयत्न करत आहेत. आता हा वाद थेट एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात गेला आहे. या उमेदवारीबाबतचा निर्णय आता शनिवाही होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.