Naigaon fish raid: नायगावमध्ये विदेशी मांगूर माशांचे अनधिकृत संवर्धन उघड; साडेतीन हजार किलो मासे जप्त करून नष्ट
esakal June 13, 2026 02:45 AM

पुणे : हवेली तालुक्यातील पेठ-नायगाव येथे विदेशी मांगूर जातीच्या माशांचे अनधिकृत संवर्धन सुरू असलेल्या केंद्रावर प्रशासनाने गुरुवारी (ता. ११) छापा टाकला. मत्स्यव्यवसाय विभाग आणि उरुळी कांचन पोलिसांनी केलेल्या या कारवाईत सुमारे साडेतीन हजार किलो मांगूर मासे जप्त करून ते नष्ट करण्यात आले.

या प्रकरणी गणेश शंकर गायकवाड (रा. पेठ, नायगाव, ता. हवेली) संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायगाव परिसरातील एका शेततळ्यात विदेशी मांगूर जातीच्या माशांची पैदास केली जात असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, पुणे आणि उरुळी कांचन पोलिसांनी ही कारवाई केली.

प्रतिबंधित विदेशी मांगूर माशांचे संवर्धन, संगोपन अथवा विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. पुणे जिल्ह्यात अशा प्रकारचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्यास नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.

स्थानिक जैवविविधता, आरोग्याला धोका

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, विदेशी मांगूर माशांची प्रजाती स्थानिक जलचरांना फस्त करते, ज्यामुळे पर्यावरणाची व नदीपात्रातील जैवविविधतेची मोठी हानी होते. या माशांचे सेवन केल्यास मानवी आरोग्यावर, विशेषतः यकृत आणि पचनसंस्थेवर गंभीर कर्करोगजन्य परिणाम होऊ शकतात.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.