सचिन महाराज पवार
आम्हां सांपडले वर्म । करुं भागवतधर्म ॥१॥
संत नामदेव महाराज म्हणतात, की आम्हाला जीवनाचे वर्म सापडले. वर्म म्हणजे गुपित, जीवनाचे सार आणि जगण्याचे खरे प्रयोजन. आजचा माणूस शिक्षण, पैसा, पद आणि प्रतिष्ठा यांचा शोध घेतो; परंतु जीवन का जगायचे, याचे उत्तर अनेकदा त्याच्याकडे नसते. प्रत्येक माणसाला आयुष्याचे ध्येय सापडणे आवश्यक आहे. नामदेव महाराजांना हे ध्येय भागवतधर्मात सापडले. भागवतधर्म हा केवळ धार्मिक आचार नसून प्रेम, करुणा, समता आणि सर्वांना जोडणारा जीवनमार्ग आहे. म्हणूनच हा एका प्रदेशाचा किंवा एका समाजाचा विचार नसून संपूर्ण मानवजातीसाठी असलेले वैश्विक अधिष्ठान आहे.
अवतार हा भेटला । बोलूं चालूं हा विसरला ॥२॥
येथे संतांना भेटलेला अवतार हा केवळ वैकुंठातील देव नाही. हा लोकांमध्ये वावरणारा, भक्तांमध्ये मिसळणारा आणि प्रेमासाठी स्वतःला विसरणारा कृष्ण आहे. म्हणूनच हा अवतार सर्वसमावेशक आहे. तो कोणत्याही जाती, धर्म, पंथ किंवा देशापुरता मर्यादित नाही. कृष्णाचे हे अत्यंत सोज्वळ आणि प्रेममय रूप आहे. जो सर्वांना आपले मानतो आणि सर्वांच्या जीवनात उतरतो, तोच खरा वैश्विक अवतार होय.
अरे हा भावाचा लंपट । सांडुनि आलासे वैकुंठ ॥३॥
भगवंताला कोणती गोष्ट प्रिय आहे? संत म्हणतात, तो भावाचा लंपट आहे. त्याला वैभवाची, विद्वत्तेची किंवा बाह्य दिखाव्याची अपेक्षा नाही. त्याला शुद्ध भाव हवा आहे. भक्ताच्या प्रेमासाठी तो वैकुंठ सोडून येतो. आजच्या युगात माहिती वाढली आहे, परंतु भाव कमी होत चालला आहे. नाती व्यवहारावर उभी राहत आहेत. अशा वेळी संत सांगतात की भगवंताला प्राप्त करण्याचे खरे साधन म्हणजे निर्मळ आणि निष्कपट भाव.
संतसंगतीं साधावा । धरूनि हृदयीं बांधावा ॥४॥
पण हा भाव कसा निर्माण होईल? त्याचे उत्तर संत देतात संतसंगती. संतसंग म्हणजे केवळ संतांच्या जवळ बसणे नव्हे, तर संतांनी सांगितलेला विचार हृदयात बांधणे होय. संत सांगतील तसे आचरण करणे, त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेणे आणि त्यांच्या दृष्टीने देवाला शोधणे, हेच खरे संतसंग आहे. अशा संगतीतून मन शुद्ध होते आणि भागवतधर्माची अनुभूती येऊ लागते.
नामा म्हणे केउता जाय । आमुचा गळा त्याचे पाय ॥५॥
अभंगाच्या शेवटी नामदेव महाराज समर्पणाची अवस्था व्यक्त करतात. ते म्हणतात की आता आम्ही दुसरीकडे कुठे जाणार? कारण भगवंताचे चरणच आमच्या गळ्यात बांधले गेले आहेत. ज्याला जीवनाचे वर्म सापडते, जो भागवतधर्म स्वीकारतो, जो संतसंग करतो आणि ज्याच्या अंतःकरणात शुद्ध भाव जागतो, त्याचे जीवन भगवंताशी जोडले जाते. अशा भक्तासाठी देव वेगळा राहत नाही. म्हणूनच भागवतधर्म म्हणजे देवाचा शोध, संतांचा मार्ग आणि प्रेमाने भरलेले जीवन होय.