हौस ऑफ बांबू : भ्रमणमंडळाची स्थळसंशोधन मोहीम..!
esakal June 13, 2026 11:45 AM

कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! मराठी साहित्य महामंडळाचे नामचीन पदाधिकारी आज मोहीमशीर होणार आहेत. दोन दिवस भारी गडबडीचे जाणार. शनिवारी सगळी मंडळी (पुण्यातल्या पुण्यात) तीन ठिकाणी हिंडून पाहणी करून येणार आहे. तिन्ही ठिकाणं पाहिली की मग रविवारी ऐतिहासिक घोषणा होईल. कसली काय विचारता? अहो, शंभरावं अखिल भारतीय साहित्य संमेलन यावेळी पुण्यात नाही का होणार? त्यासाठी मांडव टाकायला जागा शोधायला नको का?

ते पहा, ‘मसाप’चे कोषाध्यक्ष आणि नामाबर शायर जनाब प्रदीप निफाडकरसाहब स्कूटरला किक्क मारत आहेत. आधी कुठं जायचं? फर्ग्युसनला की एसपीला? अशी विचारणा ते हेल्मेट हातात धरून करीत आहेत. टिळक रोडच्या गर्दीत मिसळून लांब जाऊन राजेश पांडे यांचा फोन ट्राय करणारे अध्यक्ष सोमणमहाराज सावधपणे इकडे तिकडे बघत आहेत. विदर्भातून खास आलेले ॲड. लखनसिंह कटरेसाहेब आपणच ठिकाण ठरवणार, हे ठरवूनच आलेले दिसत आहेत. आमच्या स्वातीताई महाळंक (नेहमीप्रमाणे) अर्ध्या-पाऊण तास उशिराने येऊन ‘रस्त्यात अपघात झाल्याचं’ गालावर हात ठेवून सांगणार आहेत. सगळं काही ठरल्याप्रमाणे पार पडत आहे...

कोणीही कितीही आणि काहीही ठरवलं तरी राजेश पांडेजी बोट दाखवणार, तिथंच ठेकेदार (मांडवाचे) बांबू आणून टाकणार, हे उघड आहे. तरीही भ्रमणमंडळ निघालं आहे.

डेक्कनवरचं फर्ग्युसन महाविद्यालयाचं प्रशस्त आवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा भलामोठा कॅम्पस आणि एसपी कॉलेजचं विशाल मैदान ही संभाव्य ठिकाणं आहेत. पोलिस मैदानाचा पर्यायही आहे. पण वर उल्लेखिलेली तीन ठिकाणं नजरेत आहेत. यापैकी एका ठिकाणी शंभरावं साहित्य संमेलन पार पडणार, हे आता नक्की झालंय.

तीन ठिकाणं आणि तीन संस्कृती! फर्ग्युसनचा तोरा मोठा...इथली हवा खाल्ली की विद्यार्थी आपोआप आधुनिक होतो, असा (उगाचच) एक गैरसमज आहे. वस्तुस्थिती वेगळी आहे. आधुनिक असल्याशिवाय इथल्या आवारात प्रवेश मिळणंच अवघड असतं. पार्किंग (दुचाकी फक्त) मोठं आहे, पण समोरच्या ‘वैशाली’ आणि गल्लीतल्या ‘अण्णा’कडे इडलीच सत्तर-ऐंशीच्या घरात जाते. मराठी लेखक तिथं कसे जाणार? असा प्रश्न आहे.

सर परशुरामभाऊ महाविद्यालय ऊर्फ एसपी कॉलेजचं पटांगण हे तर पुण्याच्या पेठसंस्कृतीचं आगर. इथं मराठी सांस्कृतिकविश्वाचं केंद्र आहे, असं मानलं जातं. पुणेकरांना सर्वांत जास्त ज्ञान असतं, असा जो एक (रास्त) समज जगभर पसरला, त्याला कारणीभूत एसपी कॉलेजच आहे. याच नावाची बिर्याणीही पुण्यात फेमस आहे, आणि तीही जवळच आहे. बिर्याणी नको असेल, तर रामनाथची जहाल मिसळ आहे, तेही नको असेल तर ‘बादशाही’चा नेमस्त पर्यायही उपलब्ध आहेच.

पुणे विद्यापीठात मोकळी जागा वगळता फारसं काही नाही. नाही म्हणायला एक मोठं वसतीगृह आहे, इतर काही इमारती आणि सभागृह आहेत. पुणे विद्यापीठाचं आवार हाही एक चांगला पर्याय आहेच. कारण इथलं ‘अनिकेत’ क्यांटिन कैक वर्षं ‘कडक्यां’ना सांभाळण्याचं कर्तव्य करत आलंय.

तिन्ही ठिकाणी वाहतूक कोंडी होईलच, यावर स्थळ निवड समितीचं आधीच एकमत झालंय. कारण संमेलनाच्या निमित्तानं ५० हजाराहून अधिक अभ्यागत येतील, असा एक प्राथमिक अंदाज आहे. खानपान आणि निवासासाठी सोयीचं ठिकाण निवडू या, असा स्थळनिवड समितीचा विचार दिसतो आहे.

पण काळजीचं कारण नाही. जगी ज्यास कोणी नाही, त्यासी राजेश पांडेजी आहेतच. एकाच वेळी संमेलन आणि पुस्तक महोत्सव भरवण्याची ताकद असलेल्या पांडेजींनी मनात आणलं तर लगेहाथ खाद्य महोत्सवही घेऊन टाकणं त्यांना काय कठीण आहे?

...उद्या काय ते कळेलच!

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.