Maharashtra News Live Update : भिमाशंकर मंदिर उघडण्याआधी मुख्यमंत्र्यांचा दौरा
Saam TV June 13, 2026 11:45 AM
अनुराधा इंजिनिअरिंग-पॉलिटेक्निक प्रकरणात मोठी कारवाई; मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांवर गुन्हा दाखल

चिखली येथील रामकृष्ण परमहंस मौनीबाबा शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे आणि शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुराधा इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक महाविद्यालयांच्या परवानग्यांसाठी सादर करण्यात आलेली काही प्रमाणपत्रे बनावट असल्याचा आरोप असून, त्याआधारे शासनाचा निधी मिळविण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 465, 467, 468, 471 आणि 120-ब अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीनसिंह चौहान करीत आहेत.

महावितरणच्या २२ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरात वीज दुरुस्तीचे काम करताना महावितरणच्या २२ वर्षीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू गौरव सुरेश मोरे असे मृत कामगाराचे नाव आहे.

विरारच्या चोरघे टॉवरजवळील वीज खांबावर गुरुवारी दुरुस्तीचे काम सुरू असताना गौरव याला अचानक विजेचा तीव्र धक्का बसला. धक्क्यामुळे तो खांबावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाला होता.

स्थानिक नागरिक आणि सहकाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी विरार पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

भिमाशंकर मंदिर खुलण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा दौरा; विकासकामे, सुरक्षा आणि भाविक सुविधांची प्रत्यक्ष पाहणी

पाच महिन्यांनंतर १५ जूनपासून श्रीक्षेत्र भिमाशंकर मंदिर भाविकांसाठी खुले होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज भिमाशंकरमध्ये दाखल होत असून विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या कामांचा, सुरक्षा व्यवस्थेचा आणि भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या सुविधांचा सखोल आढावा घेणार आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.