दुबईतील अपघातात ठार झालेल्या श्रमिकांच्या मदतीसाठी भारतीय वंशाचे उद्योजक, समाजसेवक आणि बर्जील होल्डिंग्सचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शमशीर वायलिल हे पुढे आले आहेत. त्यांनी या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांसाठी 2.6 कोटींचा मदतनिधी जाहीर केला आहे. मानतवादी दृष्टीकोणातून त्यांनी ही मदत जाहीर केली आहे. डॉ. शमशीर हे अत्यंत संवेदनशील उद्योजक आहेत. यापूर्वीही त्यांनी अशा प्रसंगामध्ये भारतीयांना मदतीचा हात दिलेला आहे.
या मदत योजनेचा लाभ अपघातामुळे प्रभावित झालेल्या सर्व व्यक्तींना मिळणार आहे. या अंतर्गत मृत्यूमुखी पडलेल्या सात जणांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 26 लाखांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच जखमी झालेल्या नऊ जणांच्या उपचार आणि पुनर्वसनाच्या गरजांनुसार एकूण 47 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय, कुटुंबीयांच्या तातडीच्या प्रवास व निवासासाठी 18 लाख आणि प्रभावित कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणासाठी 13 लाखांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.
ही मदत योजना तातडीचा आर्थिक दिलासा देण्याबरोबरच आपल्या कुटुंबाचा प्रमुख आधार गमावलेल्या कुटुंबांचे आणि त्यांच्या मुलांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली आहे. विशेषतः लहान मुलांवर अवलंबून असलेल्या कुटुंबांच्या दीर्घकालीन गरजांचा विचार करून या योजनेची आखणी करण्यात आली आहे.
सर्व प्रभावित कुटुंबांना मदत
मिळालेल्या माहितीनुसार, दुबईतील एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. मिनी बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे रस्त्यावर थांबलेल्या ट्रकच्या मागील बाजूस मिनीबस आदळल्याने हा भीषण अपघात घडला.
या दुर्घटनेतील पीडितांमध्ये भारत, श्रीलंका आणि नेपाळ येथील कामगारांचा समावेश होता. माहितीनुसार, मृतांमध्ये सहा भारतीय आणि एक श्रीलंकन नागरिक होता. मृत भारतीयांपैकी तिघे उत्तर प्रदेशचे तर तिघे तेलंगणातील होते. जखमी झालेल्या नऊ जणांपैकी आठ भारतीय असून त्यात केरळमधील दोघांचा समावेश आहे, तर एक जण नेपाळचा नागरिक आहे. जखमींपैकी पाच जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असून तीन भारतीयांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. भारतीय कुटुंबांपर्यंत ही मदत योग्य प्रकारे पोहोचावी यासाठी भारतीय वाणिज्य दूतावास, दुबई यांच्याशी समन्वय साधण्यात आला असून आवश्यक ती माहिती त्यांना देण्यात आली आहे.
वेदनादायी घटना
याबाबत डॉ. शमशीर म्हणाले, “आम्ही भारतीय वाणिज्य दूतावासाच्या सहकार्याने भारतीय कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवत असलो, तरी मानवतेच्या भावनेतून या दुर्घटनेमुळे प्रभावित झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मदत केली जाईल.” या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी परदेशात राहून कष्ट करणाऱ्या कामगारांच्या त्यागाची ही घटना अत्यंत वेदनादायी आठवण करून देते.
कुटुंबाच्या पाठी ठाम
“ही अत्यंत हृदयद्रावक दुर्घटना असून तिचा परिणाम अनेक देशांतील कुटुंबांवर झाला आहे. आपल्या कुटुंबाच्या आशा, जबाबदाऱ्या आणि स्वप्ने पूर्ण करण्यासाठी हे कामगार येथे आले होते. कोणतीही आर्थिक मदत त्यांच्या जीवाची भरपाई करू शकत नाही. मात्र, या सहाय्यामुळे दुःखात असलेल्या कुटुंबांना काहीसा दिलासा मिळेल आणि जखमींना त्यांच्या पुनर्वसनात मदत होईल, अशी आम्हाला आशा आहे. या कठीण काळात आम्ही प्रत्येक प्रभावित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असे डॉ. शमशीर यांनी सांगितले.
यापूर्वीही अशा अनेक आपत्कालीन परिस्थितींमध्ये डॉ. शमशीर यांनी प्रभावित कुटुंबांना महत्त्वपूर्ण मदत केली आहे. अहमदाबाद येथील एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर त्यांनी मृत्यूमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांसाठी 6 कोटींच्या आर्थिक सहाय्याची घोषणा केली होती.