कासेगाव : गोंदवले व म्हसवड येथील देवदर्शन करून मूळ गावी पंढरपूरकडे (इसबावी) परतत असताना भाविकांवर काळाने घाला घातला. भाविकांना घेऊन जाणारे मालवाहू वाहन (पिकअप) माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी हद्दीत रस्त्याकडेच्या विहिरीत कोसळून पंधरापैकी आठ भाविकांचा (Pandharpur devotees pickup well accident) मृत्यू झाला.
दरम्यान, रांजणी (ता. पंढरपूर) येथील सागर चौगुले यांचा स्वतःचा छोटा हत्ती असल्याने त्यांनी आपल्या बहिणी व लहान मुलांना म्हसवड येथील कुलदैवत सिद्धनाथ दर्शनासाठी जाण्याचे ठरवले. १५ जूनला शाळा चालू होणार असल्यामुळे ते स्वतःचा छोटा हत्ती घेऊन पंढरपूरहून आपल्या लाडक्या बहिणींना देवदर्शन घडविण्यासाठी गेले. दर्शन झाल्यानंतर सर्वजण एके ठिकाणी जेवायला थांबले.
जेवण करून सर्वजण गाडीत बसले व काही क्षणात त्यांच्यावर काळाने घाला घातला. छोटा हत्तीमध्ये १५ जण होते, त्यापैकी आठजणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर पाच जणांना पाण्यातून शेजारी लोकांनी बाहेर काढले व तीनजण उड्या मारून बाहेर निघाले होते.
एमएसआरडीच्या चुकीमुळे अपघातरस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीला कठडा तयार करावा अशी मागणी विहीर मालक रामकृष्ण कदम यांनी अनेक वेळा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केले. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या अपघातामध्ये आठ जणांचे नाहक बळी गेले आहेत असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याप्रकरणी संबंधित अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी विहीर मालकासह तांदुळवाडी ग्रामपंचायीचे सदस्य विजय पवार यांनी केली आहे.
Tandulwadi Accident : इरफान बनला 'देवदूत'! चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत मारली उडी अन् चौघांचा वाचवला जीव; डोळ्यांदेखत गाडी 200 फुटांवरूनच... अपघाताच्या चौकशीचे आदेशयेथील अपघाताची सविस्तर चौकशी करण्याचे आदेश पोलिस विभागाला दिले आहेत. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. जिल्ह्यातील रस्त्याच्या कडेला असलेल्या सर्व विहीरीची माहिती घेवून त्यांना संरक्षक कठडे बसविण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन सांगितले.
अपघातासाठी ठेकेदारच जबाबदार : पालकमंत्रीअपघाताला ठेकेदारच दोषी आहे. या रोडचे काम अनेक वर्षांपासून सुरू आहे, वारंवार त्याला सूचना केल्या, आदेश, नोटिसा दिल्या, सगळे केले, पण प्रत्येकवेळी गडकरी साहेबांनी बैठका घेतल्या, कायद्याचा आधार घेऊन त्याने आजपर्यंत रस्त्यामध्ये प्रचंड अडचणी निर्माण केल्या. यापूर्वी अनेकांना या रोडवर जीव गमवावा लागला, त्याचीही चौकशी केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत त्याला सोडणार नाही. ब्लॅक लिस्टमध्ये टाकणे ही छोटी कारवाई आहे, त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, तशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
काही अधिकाऱ्यांनीही त्याकडे दुर्लक्ष केले, अपघाताच्या ठिकाणी कोणताही फलक नाही, त्या सगळ्या दोषींवर कारवाई केली जाईल. यात कोणालाही सोडले जाणार नाही. रस्त्यालगत विहिरी असणे उचित नाही. त्याचा सर्व्हे लगेच सुरू केला जाईल, तशा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. रस्त्यालगतच्या विहिरीजवळ संरक्षक कठडे बांधले जातील, विहिरी बुजवाव्या लागतील तरी त्या बुजविल्या जातील.