मे महिन्यात 4,275 अब्ज रुपयांचा व्यवहार : घाऊक महागाई दरही अधिक,
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताच्या निर्यातीत मे महिन्यात विक्रमी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. निर्यातीतील वाढ 18 टक्के असून आयातही 20.62 टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, निर्यात वाढल्याने भारताची व्यापारी तूट या महिन्यात तुलनेने जवळपास समतोल राहिल्याचे दिसून आले आहे. मे महिन्यात भारताची निर्यात 45.2 अब्ज डॉलर्स (जवळपास 4 हजार 275 अब्ज रुपये) इतकी झाल्याचे दिसून येत आहे.
भारताची आयातही वाढली असून ती मे मध्ये 73.41 अब्ज डॉलर्सची आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर वाढल्याने भारताच्या आयातीचा खर्चही वाढला आहे. तेलदर कमी झाल्यास भारताची व्यापारी तूटही कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली.
युद्धाचा परिणाम
भारताच्या निर्यातीवर आखाती युद्धाचा काही प्रमाणात विपरीत परिणाम झालेला आहे, असे दिसून येते. युद्धाचा प्रारंभ झाल्यानंतर मार्च 2026 मध्ये निर्यातीत काही प्रमाणात घट झाली. तथापि, एप्रिलमध्ये निर्यात सुधारली. मे मध्ये आणखी सुधारणा झाली. अशा प्रकारे मे मध्ये निर्यात 18 टक्के अधिक आहे. मे 2025 मध्ये झालेल्या निर्यातीच्या तुलनेत थोडी अधिक आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार झाल्यास भारताचा व्यापार अधिक सुकर होईल. आम्ही प्रतीक्षा करीत आहोत, अशी माहिती व्यापार सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली.
12 वर्षांमध्ये विस्तारला पाया
गेल्या 12 वर्षांमध्ये केवळ निर्यात वाढली असे नव्हे, तर निर्यातीचा पायाही अधिक प्रमाणात विस्तारला आहे. भारत आता पूर्वीपेक्षा अधिक वस्तू आणि सेवा यांची निर्यात अधिक देशांना करु लागला आहे. या कालावधीत देशाच्या वस्तू निर्यातीत दुप्पट वाढ झाली. तर देशाच्या सेवा निर्यातीत तिप्पट वाढ झाली आहे. भारताने अनेक देशांशी गेल्या दीड वर्षात व्यापार करार केले आहेत. ते जसजसे कार्यान्वित होतील, तशा प्रमाणात देशाचा जागतिक व्यापार वाढत जाणार आहे. आणखी करार केले जाणार आहेत, असे प्रतिपादन अग्रवाल यांनी केले आहे.
चीनकडून आयातीत वाढ
मे मध्ये चीनकडून भारतात होणाऱ्या आयातीत वाढ होऊन ती 24.7 अब्ज डॉलर्सची झाली. गेल्या वर्षी याच काळात ती 20.22 अब्ज डॉलर्स होती. भारताने अमेरिकेकडूनही आता इंधन वायू आयात करण्यास प्रारंभ केला असून अमेरिकेचा इंधन वायू भारतापर्यंत पोहचू लागला आहे. अमेरिकेकडून भारत कच्च्या इंधन तेलाची आयातही करीत आहे. अमेरिकेला भारताकडून होणाऱ्या निर्यातील मे महिन्यात 0.5 टक्के, तर युरोपियन महासंघाला होणाऱ्या निर्यातील 0.47 टक्के आणि चीनला होणाऱ्या निर्यातीत 25. 85 टक्के वाढ नोंद करण्यात आली आहे.
घाऊक महागाई दरात मोठी वाढ
निर्यातीत झालेल्या वाढीसमवेतच भारताच्या घाऊक महागाई दरातही मोठी वाढ झाली असून ते अर्थव्यवस्थेसाठी चिंतेचे कारण ठरु शकणार आहे. मे महिन्यामध्ये घाऊक महागाईचा दर 9.68 टक्के इतका आहे. एप्रिलमध्ये तो 8.26 टक्के होता. मे मधील घाऊक महागाई दर गेल्या 43 महिन्यांमधील सर्वात अधिक आहे. इंधनाच्या किमती आणि दैनंदिन वस्तूंची किमती वाढणे हे महागाई वाढण्याचे खरे कारण आहे. मे महिन्यात किरकोळ महागाई दर वाढून 3.93 टक्के झाला आहे. एप्रिलमध्ये तो 3.48 टक्के होता. घाऊक महागाईचा दर अधिक काळ चढा राहिला तर किरकोळ महागाईचा दरही वाढून ग्राहकांना फटका बसू शकतो. डिझेलचे दर वाढल्याने वाहतुकीचा खर्च वाढला आहे. परिणामी जीवनावश्यक वस्तू आणि इतर वस्तूंचेही दर वाढले आहेत. घाऊक महागाई दरावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केंद्रातील सरकार युद्धाचा प्रारंभ झाल्यापासूनच करीत आहे
आव्हाने असूनही प्रगती
ड आंतरराष्ट्रीय आव्हाने असूनही भारताच्या निर्यातीत समाधानकारक वृद्धी
ड घाऊक महागाई दरात वाढ हा चिंतेचा विषय, नियंत्रणासाठी अनेक उपाय
ड आखातातील युद्ध थांबल्यास भारताच्या व्यापारात आणखी वाढ निश्चित