दिवसभराच्या धावपळीनंतर रात्रीचे जेवण आणि त्यानंतरची झोप हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र अनेकजण उशिरा जेवून लगेच झोपण्याची सवय लावून घेतात. ही सवय पचनसंस्थेवर ताण आणू शकते आणि ॲसिडिटी, अपचन तसेच झोपेच्या समस्या निर्माण करू शकते. तज्ज्ञांच्या मते, रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये योग्य अंतर ठेवणे हे हेल्दी लाईफस्टाईलसाठी आवश्यक आहे.
झोपण्यापूर्वी किती वेळ आधी जेवावं?
तज्ज्ञांच्या मते, रात्रीचे जेवण झोपण्यापूर्वी किमान 2 ते 3 तास आधी करणे योग्य मानले जाते. यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि पोटावर अतिरिक्त ताण येत नाही. विशेषतः ज्यांना वारंवार ॲसिडिटी, गॅस किंवा एसिड रिफ्लक्सचा त्रास होतो, त्यांनी हे अंतर 3 तास किंवा त्याहून अधिक ठेवणे फायदेशीर ठरू शकते. उदाहरणार्थ, जर तुम्ही रात्री 10 वाजता झोपत असाल तर 7 ते 8 वाजेपर्यंत जेवण पूर्ण करणे योग्य ठरेल. तसेच 11 वाजता झोपण्याची सवय असल्यास रात्री 8 वाजेपर्यंत जेवण उरकणे अधिक लाभदायक ठरते.
जेवण आणि झोप यामध्ये अंतर का आवश्यक आहे?
1) पचनक्रिया सुरळीत राहते
जेवल्यानंतर अन्न पचण्यासाठी शरीराला वेळ लागतो. जेवण झाल्यानंतर लगेच झोपल्यास पचन प्रक्रिया मंदावू शकते. त्यामुळे पोट जड वाटणे, अपचन आणि अस्वस्थता जाणवू शकते.
2)ॲसिडिटी टाळता येते
जेवल्यानंतर त्वरित आडवे झाल्यास पोटातील आम्ल अन्ननलिकेकडे वर येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि एसिड रिफ्लक्ससारख्या समस्या उद्भवू शकतात.
3) शांत झोप
झोपेदरम्यान शरीर पुनर्बांधणीचे काम करत असते. मात्र पचन प्रक्रिया सुरू असल्यास झोपेचा दर्जा कमी होऊ शकतो. हलके पोट असल्यास झोप अधिक शांत आणि आरामदायी होते.
4) वजन नियंत्रण
रात्री उशिरा जेवण्याची सवय मेटाबॉलिझमवर परिणाम करू शकते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी साठण्याचा धोका वाढतो. योग्य वेळी जेवण केल्यास वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळू शकते.
रात्रीच्या जेवणासाठी उपयुक्त टिप्स
– शक्यतो रात्रीचे जेवण संध्याकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान करावे.
– रात्रीचे अन्न हलके आणि सहज पचणारे असावे.
– अतितेलकट, मसालेदार किंवा जड पदार्थ टाळावेत.
– जेवल्यानंतर थोडे चालणे फायदेशीर ठरते.
– उशिरापर्यंत जागे राहावे लागत असल्यास सूप, फळे किंवा कोमट दूध यांसारखा हलका आहार घ्यावा.