Car Accident : नवापूरजवळ कार दुभाजकावर आदळली; महिला जागीच ठार; तीन गंभीर जखमी
esakal June 17, 2026 09:45 PM

नवापूर - देवलफळी पुलावर मंगळवारी (ता. १६) झालेल्या भीषण अपघातात ५१ वर्षीय महिला जागीच ठार झाली, तर तिघे गंभीर जखमी झाले. लग्नाच्या आनंदासाठी अहमदाबादहून निघालेल्या बडगुजर कुटुंबावर काळाने घाला घातला. यामुळे लग्नाऐवजी घरावर शोककळा पसरली.

अहमदाबाद येथील बडगुजर कुटुंब लहान बंधू मनोज बडगुजर यांच्या २२ जूनला होणाऱ्या विवाहासाठी पिंपळगाव हरेश्‍वर येथे जात होते. कार (जीजे ०१, डब्ल्यू ९०९३) सुरतकडून पिंपळगावकडे जात होती. मंगळवारी दुपारी राष्ट्रीय महामार्गावर नवापूर शहराजवळील देवलफळी पुलावर चालकाचे नियंत्रण सुटले. कार थेट रस्त्यावरील दुभाजकावर जोरात आदळली.

धडक इतकी भीषण होती, की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या अपघात पुष्पाबाई अनिल बडगुजर (वय ५१, रा. अहमदाबाद) जागीच ठार झाल्या. तर सुमित अनिल बडगुजर (वय २१) आणि सविता भूषण बडगुजर (वय २८) गंभीर जखमी झाले. भूषण अनिल बडगुजर (वय ३१), देवयानी भूषण बडगुजर (वय ६) आणि त्रिशू भूषण बडगुजर (वय ५) यांना किरकोळ दुखापत झाली. जखमींवर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

चिमुकल्यांचा हृदयद्रावक आक्रोश

अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या देवयानी आणि त्रिशू या दोन चिमुकल्या मुलींनी आजी, आई व काकांची अवस्था पाहून मोठ्याने रडायला सुरुवात केली. हा प्रसंग पाहून घटनास्थळी जमलेल्या नागरिकांच्याही डोळ्यात पाणी आले. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत सर्वांना कारमधून बाहेर काढले आणि नवापूर पोलिसांना माहिती दिली. त्यावरून नवापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर अचानक आलेल्या या दुर्घटनेमुळे पिंपळगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.