पुणे - ‘कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात बांधकाम व्यावासयिक विशाल अगरवाल याला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर समाज माध्यमात अगरवाल आणि कुटुंबीय जल्लोष करतानाची कथित चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली. त्याची दखल घेत जामीन रद्द करण्यासाठी पुणे पाेलिसांकडून २३ जून रोजी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली.
कल्याणीनगर भागात पोर्शे या भरधाव मोटारीने दुचाकीस्वार तरुण-तरुणीला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अगरवाल याच्या अल्पवयीन मुलासह मित्रांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी अगरवाल आणि साथीदारांनी ससूनमधील डाॅक्टरांशी संगनमत केले होते. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर विशाल अगरवाल याला अटक करण्यात आली होती. अगरवालने सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
सर्वोच्च न्यायालयाने कठोर अटी, शर्तींवर अगरवालचा जामीन मंजूर केला होता. यानंतर अगरवाल याची कुटुंबीयांसोबत जल्लोष करताना कथित चित्रफीत प्रसारित झाली होती. ही चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून घेतले. जबाब आणि डिजिटल पुरावे न्यायालयात सादर केले जाणार आहेत. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने अगरवाल याला घालून दिलेल्या अटींचा भंग झाल्याची माहिती न्यायालयात दिली जाणार आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
दरम्यान, विशाल अगरवाल याने संबंधित चित्रफीत २०२३ मधील असल्याचा दावा केला होता. जामीन मिळाल्यानंतर जल्लोष केला नाही, असे अगरवाल याने सांगितले होते. मात्र, पोलिसांनी ही बाब जल्लोषाची चित्रफीत ही समाज माध्यमातील स्टेटसवर ठेवणे ही बाब मृतांच्या कुटुंबीयांची भावना दुखावणारी आहे, असे सांगितले.