देह-संदेह : वळवून अक्षरांना केले तुला शहाणे..
esakal June 20, 2026 09:45 AM

विश्राम ढोले, माध्यम, तंत्रज्ञान व संस्कृतीचे अभ्यासक

आपल्याकडे जूनमध्ये शाळा सुरू होतात. नवी पुस्तके, नव्या वह्या किंवा पाट्या, नव्या कंपासपेट्या असा सगळा जामानिमा घेऊन मुलं उत्साहाने शाळेत येऊ लागतात. स्वीडनमध्येही यंदा ऑगस्टमध्ये असेच चित्र दिसणार आहे. तुम्ही म्हणाल यात नवल ते काय; पण पुस्तक, वह्या आणि पेन घेऊन शाळेत येणारी मुलं हे चित्र स्वीडनमध्ये गेली काही वर्षे दिसतच नव्हते. मुलं शाळेत त्याच उत्साहाने यायची; पण त्यांच्यासोबत वह्या पुस्तके नसायची. असायचे ते टॅबलेट. त्यांचे सारे वाचणे, लिहिणे, आकृत्या काढणे घडायचे ते टॅबलेटच्या गुळगुळीत पडद्यावर. यंदा मात्र तसे नसणार. कारण स्वीडिश सरकारने शाळांमधून टॅबलेट, लॅपटॉप, मोबाईल हद्दपार केले आहेत. पुस्तक, वह्या, पेन आता वर्गांमध्ये परत दिसणार आहेत. या बदलासाठी सरकारने तब्बल वीस कोटी डॉलरची तरतूदही केली आहे.

आता हा बदल नवल वाटावा, असा यासाठी आहे की, गेली सुमारे पंचवीसेक वर्षे स्वीडन सातत्याने शालेय शिक्षण डिजिटल करण्यावर भर देत होते. त्याची सुरुवात झाली १९९०च्या दशकात. पहिल्यांदा त्याचा भर डिजिटल कौशल्ये शिकविण्यावर होता. पण या २०१०च्या आसपास बहुतेक सरकारी शाळांनी पुस्तकांच्या जागी टॅबलेटस आणायला सुरुवात केली. हे इतक्या वेगाने वाढत गेले की, २०१५च्या सुमाराला प्रत्येक मुलामागे एक टॅबलेट हे जणू प्रमाण बनले. दहाएक वर्षांपूर्वी स्वीडिश सरकारने शालेय शिक्षणाच्या डिजिटलीकरणासंबंधीचे राष्ट्रीय धोरणही जाहीर केले. शालेय शिक्षणाच्या डिजिटलीकरणामध्ये सर्व जगात अग्रेसर रहायचे, ही या धोरणामागची प्रेरणा होती.

मुळातच स्वीडनसह, फिनलंड, नॉर्वे, डेन्मार्क या नॉर्डिक देशांमधील शालेय शिक्षण दर्जेदार म्हणून प्रसिद्ध. त्यामुळे शालेय शिक्षण डिजिटल करण्यावर त्यांनी दिलेला भर पाहून इतर अनेक देशांची त्यांचे अनुकरण करायला सुरुवात केली. आणि आता स्वीडनप्रमाणेच इतरही नॉर्डिक देशांनी शालेय शिक्षणाच्या बाबतीत ‘डिजिटल फर्स्ट’ या धोरणापासून फारकत घ्यायला सुरवात केलीय. पडद्यापासून ‘यू टर्न’ घेऊन या व्यवस्था पुन्हा पुस्तकाकडे परत येत आहेत. या प्रत्येक देशांच्या ‘यू टर्न’ची वेळ आणि ‘गती वेगवेगळी आहे. पण ते ‘यू टर्न’ घेताहेत हे नक्की.

कशामुळे घडतोय हा बदल? ‘डिजिटल फर्स्ट’ शिक्षणाचा उत्साह दहापंधरा वर्षातच का मावळतोय? पूर्ण डिजिटल वातावरणात वाढलेल्या या विद्यार्थ्यांच्या खऱ्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख खाली येत आहे, हे या ‘यू टर्न’मागील मुख्य कारण आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या लेखन-वाचन क्षमतांचे मूल्यमापन करणारा ‘दी प्रोग्रेस इन इंटरनॅशनल रिडिंग लिटरसी स्टडी’ या नावाचे एक सर्वेक्षण दरवर्षी जगभरात करण्यात येते. नॉर्डिक देशांना त्यात नेहमी चांगले सरासरी गुण मिळायचे. आता ते गाळात गेले असे नाही. पण पंधरा वर्षांपूर्वी मिळणाऱ्या गुणांच्या तुलनेत गेली काही वर्षे या देशांचा आलेख सातत्याने आणि वेगाने खाली येत आहे. एका प्रस्थापित आणि व्यापक चाचणीत सातत्याने होत असलेल्या या घसरणीची तिथल्या शिक्षणतज्ज्ञ आणि सरकारने गांभीर्याने दखल घेतली. स्वीडनमधील ‘कॅरोलिन्सका इन्स्टिट्यूट’ ही वैद्यकीय संशोधनतील एक मातबर संस्था. या संस्थेने केलेल्या संशोधनात आढळले की ‘डिजिटल फर्स्ट’ वातावरणात वाढलेल्या या शाळकरी मुलांचा लक्षपूर्वक कृती करण्याचा अवधी (अटेन्शन स्पॅन) वेगाने कमी होतोय. त्यांच्या काही मूलभूत मनो- कायिक-बौद्धिक क्षमतांची नैसर्गिक जुळणी बिघडलीय. स्थळ-काळात सहजपणे पाळायचे शारीरभान आणि तोल सुटतोय. लिहिण्या-वाचण्यातून तयार होणाऱ्या दीर्घकालीन स्मृतींचे प्रमाणही कमी होत चालले आहे.

शिकण्याचा शारीर अनुभव याशिवाय मुलांच्या इतरही बौद्धिक आणि मानसिक वर्तनामध्ये होत असलेले बदल अनुभवी शिक्षकांनाही जाणवत होतेच. या सगळ्यांचा रेट्यामुळे नॉर्डिक देशांनी पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळण्याचा निर्णय घेतला. पारंपरिक पद्धतीकडून ‘डिजिटल फर्स्ट’ पद्धतीच्या शिकण्याकडे वळल्याने असे काय झाले की, ज्यामुळे या शाळकरी मुलांच्या प्रगतीचा आलेख घसरू लागला? डिजिटल व्यवस्थेमुळे या मुलांचा शिकण्याच्या प्रक्रियेतील सदेह सहभाग कमी होत गेला, हे या प्रश्नाचे एक खोलवरचे उत्तर आहे. लहान मूल फक्त पाहून शिकत नसते. पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, गंध आणि चव घेणे या पाच मूलभूत क्रियांच्या एकात्मिक आणि सदेह आधारावर मुलांची शिकण्याची क्षमता विकसित होत असते. त्या अर्थाने लहान मुलंच कशाला; प्रौढ व्यक्तीचे शिकणेही एक खोलवरचा शारीर अनुभव असतो, असे अनेक संशोधनांत आढळले. पण झळाळत्या पडद्यावर फक्त क्लिकपुरता स्पर्शानुभव देणारी, वेगवान दृश्ये दाखविणारी, चहूबाजूंनी येणाऱ्या आवाजाऐवजी फक्त ‘स्पीकर’मधील आवाजाकडे लक्ष वेधणारी डिजिटल व्यवस्था शिकणाऱ्या लहानग्यांना गुंगवून टाकत असली तरी शिकण्याच्या मूळ प्रक्रियेमध्ये गुंतवून टाकत नाही. उलटपक्षी त्यामुळे लक्ष देणे, कोलाहलातून मार्ग काढणे, विविध शारीर-मानसिक अनुभवांची सांगड घालणे, देहानुभवातून दीर्घकालीन स्मृती निर्माण करणे वगैरे क्षमता खुरटण्याची भीती असते. एका अर्थाने अतिशय संवेदनशील वयामध्ये शिकण्याच्या प्रक्रियेत देहाला दुयमत्व दिले, पंचेद्रियांपैकी एकावरच भर दिला आणि शिकण्याला समीप संदर्भापासून तोडले की काय होऊ शकते, याचा एक धडाच नार्डिक देशांच्या अनुभवांतून मिळाला आहे. हा धडा म्हणजे डिजिटल तंत्रज्ञानाला पूर्ण विरोध नाही. त्यांच्याद्वारे शिकण्याच्या क्षमतांना दिलेला नकारही नाही; पण त्याचे प्रमाण, उद्दिष्ट आणि वेळ याबाबत अतिशय तारतम्य बाळगले पाहिजे, आणि मुख्य म्हणजे शिकण्याच्या या प्रक्रियेमध्ये सदेह अनुभव मध्यवर्ती असले पाहिजे हा या संपूर्ण प्रकरणाचा खोलवरचा संदेश आहे.

खूप वर्षांपूर्वी आलेल्या अष्टविनायक चित्रपटात ‘दाटून कंठ येतो...’ हे एक अतिशय हृद्य गाणे होते. लाडक्या लेकीची सासरी पाठवणी करताना वडिलांच्या तोंडी हे गाणे येते. लेकीला लहानपणी मुळाक्षरे शिकविण्याच्या आठवणीत रमताना वडील म्हणतात, “वळवून अक्षरांना केले तुला शहाणे, जातो सुखावुनी मी त्या गोड आठवाने”. खरे दीर्घकालीन शिक्षण असेच असते. तिथे अक्षर टाइप करून भागत नसते. ते अनेकदा गिरवावे लागते, वळवावे लागते. लिहिणे, वाचणे हे शारीर अनुभव बनावे लागतात. तसे होते तेव्हा शिकणारा शहाणा होतो आणि शिकविणारा सुखावतो. शिकण्याच्या प्रक्रियेतील शरीराच्या या टप्प्याबद्दलची चर्चा पुढील लेखात.

शिकण्याच्या प्रक्रियेत देहाला दुयमत्व दिले, पंचेद्रियांपैकी एकावरच भर दिला आणि शिकण्याला समीप संदर्भापासून तोडले की काय होऊ शकते, याचा एक धडाच नाॅर्डिक देशांच्या अनुभवांतून मिळाला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.