इकडं आयपीएलमध्ये वैभवमुळे संपूर्ण झाकोळला अन् तिकडं इंग्लंड दौऱ्यात संघात स्थान सुद्धा नाही! यशस्वी जैस्वालच्या दुर्दैवाचा फेरा
जयदीप मेढे June 21, 2026 08:43 PM

Yashasvi Jaiswal: बीसीसीआयने इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय एकदिवसीय संघाची घोषणा केली. शुभमन गिलला कर्णधार आणि श्रेयस अय्यरला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचाही संघात समावेश आहे. 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीसाठी इंग्लंडविरुद्धची ही मालिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या दौऱ्यात पाच टी-20 आणि तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश असेल. टी-20 संघ आधीच जाहीर झाला आहे. श्रेयस अय्यर टी-20 संघाचा कर्णधार आहे.

मात्र, अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालचा संघात समावेश नाही. दुखापतग्रस्त विराट कोहलीच्या जागी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय संघात यशस्वीची निवड झाली होती. दुसरीकडे, आयपीएलमध्ये राजस्थानकडून खेळताना जैस्वाल फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही, पण वैभवच्या दे दणादण फटकेबाजीने तो संपूर्ण बॅकफूटवर गेला आहे. यंदाच्या हंगामात फक्त वैभवच्याच फलंदाजीची चर्चा झाली. वैभवची दणकेबाजी सुरु असताना जैस्वालने त्याला साथ देणं पसंत केलं. त्यामुळे जैस्वाल आता बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.

यशस्वी जैस्वाल राजस्थान सोडणार?

दुसरीकडे, आयपीएल 2027 पूर्वी एक आश्चर्यकारक खेळाडूंची अदलाबदल होऊ शकते. मुंबई इंडियन्स (MI) आणि राजस्थान रॉयल्स (RR) हे हार्दिक पांड्या आणि यशस्वी जैस्वाल यांची अदलाबदल करण्याबाबत चर्चा करत आहेत. तथापि, दोन्ही फ्रँचायझी किंवा खेळाडूंकडून अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. हार्दिक पांड्याने गेल्या तीन हंगामांपासून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवले आहे, परंतु आयपीएल 2026 मध्ये त्याची फलंदाजी, गोलंदाजी आणि कर्णधारपद या तिन्ही विभागांमध्ये कामगिरी अपेक्षेपेक्षा कमी होती. जर ही अदलाबदल झाली, तर मुंबई इंडियन्सला दीर्घकाळासाठी एक विश्वासार्ह सलामीवीर मिळेल, तर राजस्थान रॉयल्सला एक अनुभवी कर्णधार आणि वेगवान गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या मिळेल.

वरुण चक्रवर्ती आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर

दरम्यान, वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेला मुकणार आहे. आयर्लंड आणि इंग्लंड या दोन्ही मालिकांसाठी त्याची निवड झाली होती, परंतु सध्या तो बंगळूरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) मध्ये पुनर्वसन उपचार घेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी त्याची उपलब्धता त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. बीसीसीआयच्या म्हणण्यानुसार, वैद्यकीय पथकाशी सल्लामसलत केल्यानंतर त्याच्या पुनरागमनाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय टी-20 संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.