मागील निवडणुकीत सांगली साताऱ्यात धक्कादायक निकाल, यावेळी विधानपरिषदेवर कोण जणार? उद्या निकाल
Marathi June 21, 2026 09:25 PM

सांगली सातारा एमएलसी निकाल सांगली : विधानपरिषदेच्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान झालं.  सांगली आणि सातारा जिल्ह्यातील एकूण 895 मतदारांपैकी 894 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. महायुतीत हा मतदारसंघ भाजपकडे होता तर महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे होता. भाजपनं धैर्यशील कदम यांना उमेदवारी दिली होती तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानं अभयसिंह जगताप यांना उमेदवारी दिलेली होती. याशिवाय अपक्ष उमेदवार म्हणून किशोर धुमाळ देखील रिंगणात होते.

Sangli Satara : सांगली साताऱ्याचा आमदार कोण?

सागंली सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून धैर्यशील कदम, महाविकास आघाडीतून अभयसिंह जगताप आणि अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांच्यात लढत झाली. सागंली सातारा विधानपरिषद निवडणुकीत एकूण 895 पैकी  894 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 99.89 टक्के झाली. या विक्रमी मतदानामुळं निवडणुकीतील रंगत वाढली आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीपैकी कोणाचा उमेदवार विजयी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

सांगली सातारा विधानपरिषदेची मतदारसंख्या

सांगली साताऱ्याची मतदारांची संख्या 895 इतकी आहे. त्यापैकी साताऱ्यात 472 तर सांगलीमध्ये 423 मतदार आहेत.पक्षीय बलाबल पाहता महायुतीचे पारडे जड आहे.. कारण भाजपचे 314 मतदार आहेत, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची मतदारसंख्या 111 इतकी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे 205 मतदार आहेत.  तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील 176 मतदार आहेत.महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 119, काँग्रेसकडे 73 आणि  ठाकरेंच्या शिवसेनेकडे 1 आणि अपक्षांकडे 30 मतं होती. आकडेवारीनुसार मतदान झालं असल्यास महायुतीच्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचं दिसून येतं.

महायुतीत अखेरच्या टप्प्यात दिलजमाई

सांगली सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या दरम्यान सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो प्रकार घडला होता, त्याचा परिणाम होतो की काय अशा चर्चा सुरु होत्या. अखेरच्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं महायुतीच्या उमेदवाराला म्हणजेच भाजपच्या मतदाराला मतदान करण्याचा निर्णय घेतला. साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवकांच्या बैठका स्वतंत्रपणे झाल्या. त्या बैठकीत मतदारांनी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानं महायुतीच्याच उमदेवाराला मतदान करण्याचं निश्चित करण्यात आलं. पक्षादेशाप्रमाणं मतदान झालं की क्रॉस वोटिंग झालं याबाबत स्पष्टता उद्याच्या मतमोजणीत येऊ शकते.

दरम्यान, या मतदारसंघात गेल्या निवडणुकीत काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.