शिवसेना ठाकरे गटाच्या 3 बंडखोर खासदारांचा मोठा निर्णय, दिल्लीहून पुन्हा परतणार, थेट खासगी विमानाने…, मोठी बातमी समोर
Tv9 Marathi June 21, 2026 10:45 PM

शिवसेना ठाकरे गटात मोठी फूट पडली आहे, 6 खासदारांनी बंडखोरी केली आहे. हा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार सहा पैकी पाच खासदार हे दिल्लीमध्ये असून, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे पुण्यातच होते, ते आता त्यांचं मुळ गाव असलेल्या गोवर्धनवाडीत पोहोचले आहेत. आपण अजून पक्षप्रवेशाबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, आधी कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आणि मगच निर्णय घेणार अशी भूमिका ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर केली आहे, त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे तीन बंडखोर खासदार हे दिल्लीतून पुन्हा आपल्या मतदारसंघात परतणार आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाचे तीन बंडखोर खासदार हे सोमवारी दिल्लीहून पुन्हा एकदा आपल्या मतदारसंघात परतणार आहेत. दिल्लीहून खासगी विमानाने दुपारी चार वाजता नांदेड विमानतळावर त्यांचं आगमन होणार आहे. या खासदारांमध्ये   हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, परभणीचे खासदार संजय जाधव , यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांचा समावेश आहेत. हे तीनही खासदार उद्या आपल्या मतदारसंघात परतणार आहेत, अशी माहिती सुत्रांकडून मिळत आहे. नांदेड विमानतळावरून पोलीस बंदोबस्तात ते आपआपल्या मतदारसंघाकडे रवाना होणार आहेत.

दरम्यान दुसरीकडे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मात्र शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन वाढवलं आहे. आपण अजून पक्षप्रवेशासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलं आहे. आधी कार्यकर्त्यांशी चर्चा करू आणि त्यानंतरच जो काही निर्णय आहे, तो घेऊ असं ओमराजे यांनी म्हटलं आहे. दरम्यान त्यानंतर आता ऑपरेशन टायगरची जबाबदारी ही शिवसेना शिंदे गटाकडून तानाजी सावंत यांच्याकडे सोपवली आहे. लवकरच तानाजी सावंत हे ओमराजे यांची भेट घेणार आहेत. ओमराजे यांची आता आपल्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुरू आहे, ओमराजे निंबाळकर हे नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.