अखेर तोडगा निघाला! बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे; महायुती सरकारने मान्य केल्या प्रमुख मागण्या, वेतनवाढ आणि ग्रॅच्युइटीवर निर्णय
esakal June 22, 2026 02:45 AM

मुंबईकरांना गेल्या तीन दिवसांपासून वेठीस धरणारा बेस्ट कर्मचारी संघर्ष समितीचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर आणि सरकारसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर बेस्टच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याने संघर्ष समितीने आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे बेस्ट बससेवेवर मोठा परिणाम झाला होता.

लाखो प्रवाशांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन क्षेत्रातील संबंधित प्रतिनिधींनी चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्याचे सांगितले. कर्मचाऱ्यांना देय असलेली ग्रॅच्युइटीची रक्कम यावर्षीच देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच बेस्ट उपक्रम आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले.

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्यासाठी पुढील तीन वर्षांत तब्बल 5 हजार इलेक्ट्रिक बस ताफ्यात दाखल करण्यात येणारअसल्याची महत्त्वाची घोषणाही शिंदे यांनी केली. यामुळे पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतुकीला चालना मिळणार आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2 हजार रुपयांची हंगामी वाढ देण्यात येणार असून कायम कर्मचाऱ्यांना 3 हजार रुपयांची हंगामी वाढ मंजूर करण्यात आली आहे. सरकारकडून सकारात्मक भूमिका घेतल्याने आणि प्रमुख मागण्यांवर सहमती झाल्याने संघर्ष समितीने संप मागे घेतला. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून बेस्टची सेवा पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.