पाचोड : दुचाकीवरून घराकडे परतणाऱ्या दुचाकीस्वारास पाचोड (ता.पैठण) चा आठवडे बाजार उरकून चिंचाळा (ता.पैठण) येथे जाणाऱ्या भरधाव वेगातील पिकअपने समोरासमोर जोराची धडक दिल्याने एकाच कुटुंबातील तिघे जण ठार तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना विहामांडवा - डोणगाव रस्त्यावर चौंढाळा (ता.पैठण) जवळ रविवारी (ता.२१) रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास घडली असून सर्वांना पाचोड (ता. पैठण) येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे.
यासंबंधी अधिक माहिती अशी, चौंढाळा (ता.पैठण) पारधी वस्तीवर राहणारे चव्हाण दांपत्य काही कामानिमित्त विहामांडवा (ता.पैठण) येथे काही कामानिमित्त गेले होते. आपले दिवसभराचे काम उरकून ते दुचाकीवरून घराकडे परतत होते. तोच समोरून पाचोडचा आठवडे बाजार उरकून भांडी व अन्य साहित्य घेऊन चिंचाळा गावाकडे भरधाव वेगात पिकअप (क्र. एमएच १७ के ९०७७) जात होता. दुचाकीवरील चव्हाण दांपत्या घर काही मिनिटाच्या अंतरावर असतांना समोरून येणाऱ्या या पिकअपने त्यांच्या दुचाकीस जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील सिद्धार्थ भैय्या चव्हाण (वय ३० वर्षे), पायल सिद्धार्थ चव्हाण (वय २७ वर्षे) ,आव्हान्या सिद्धार्थ चव्हाण (वय पाच वर्षं) हे जागीच ठार झाले तर संजना अभिषेक चव्हाण (वय (२२ वर्षे) ही महीला उपचारा दरम्यान मरण पावली तर दोन बालक गंभीर जखमी झाले असून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
अपघाताचे वृत्त समजताच पारधी वस्तीवरील मृताचे नातेवाईक, चौंढाळा , विहामांडवा, केकत जळगाव येथील ग्रामस्थ पाचोड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडीत , फौजदार हरेश्वर बोबडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णवाहीकेस पाचारण केले. या अपघातातील सर्वांना रुग्णवाहीकेद्वारे पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकिय अधिकारी डॉ.बाबासाहेब घुगे यांनी सिद्धार्थ भैय्या चव्हाण (वय ३० वर्षे), पायल सिद्धार्थ चव्हाण (वय २७ वर्षे), आव्हान्या सिद्धार्थ चव्हाण (वय पाच वर्षं) यांना तपासून मृत घोषित केले , तर संजना अभिषेक चव्हाण (वय (२२ वर्षे) या महीलेची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला व अन्य दोन बालकांना छ . संभाजीनगरला हलविण्यात आले. दरम्यान रस्त्यातच संजना अभिषेक चव्हाण ही उपचारापूर्वीच मरण पावली. या घटनेची माहिती मिळताच पैठणचे उपविभागिय पोलिस अधिकारी सुनिल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या अपघातात दुचाकीचा पूर्णतः चुराडा झाला असून घटनास्थळी रक्त व हाडामांसाचा सडा पडला होता. मृतकाच्या नातेवाईकाच्या आक्रोशाने परिसर व ग्रामीण रुग्णालय दणाणून गेले. समोरील दृश्य पाहून उपस्थित प्रत्येकजण हुंदके आवरू शकत नव्हता. यासंबंधी पाचोड पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पुढील तपास पाचोड पोलिस करीत आहे.