Omprakash Raje Nimbalkar : "१०० कोटी हवेत तर आमच्या किडन्या विकू, पण पक्षांतर करू नका"; उमरग्यातील शिवसैनिकांचे ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना हृदयद्रावक पत्र
esakal June 22, 2026 02:45 AM

​उमरगा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे पक्षांतर करणार असल्याच्या जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आणि प्रसारमाध्यमांवर रंगत आहेत. या चर्चांमुळे अस्वस्थ झालेल्या उमरगा आणि लोहारा तालुक्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी खासदार निंबाळकर यांना एक अत्यंत भावनिक आणि धक्कादायक पत्र लिहून पक्षांतर न करण्याची विनंती केली आहे.

"जर तुम्हाला १०० कोटींची गरज असेल, तर शिवसैनिक आमच्या किडन्या विकून १०० कोटी रुपये जमा करून देऊ, पण पक्षाशी गद्दारी करू नका," असा आक्रमक आणि काळजाला हात घालणारा इशारा या शिवसैनिकांनी दिला आहे.

शिवसेना उमरगा उपतालुका प्रमुख​सुधाकर पाटील व अन्य शिवसैनिकांनी पाठवलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ४० वर्षांपासून आम्ही कोणत्याही अमिषाला किंवा पदाला बळी न पडता निष्ठावंतपणे पक्षाचे काम करत आहोत. प्रसारमाध्यमांवर आपल्या पक्षांतराच्या बातम्या ऐकून आम्हाला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत एकही रुपया न घेता, अहोरात्र कष्ट करून आम्ही तुम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून आणले आहे. त्यामुळे तुमच्यावर आमचा हक्क आहे.

​'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांवर शिवसैनिकांचा संताप

निष्ठावंतांनी पत्रात नमूद केले आहे की, सत्ताधारी कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांकडून "ऑपरेशन टायगर" अंतर्गत पक्षांतरासाठी प्रत्येक खासदाराला शंभर कोटी रुपये मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावर भाष्य करताना शिवसैनिकांनी म्हटले आहे की, पैशांसाठी ६ लाख मतदारांचा आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा विश्वासघात करू नका. निधीअभावी मतदारसंघाचा विकास थांबणार असेल, तर आम्ही २०२९ पर्यंत जनतेच्या पाया पडून तक्रार येऊ देणार नाही, पण तुम्ही ठाकरे कुटुंबासोबतच राहावे. ​पत्राच्या शेवटी, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रकृती नाजूक असल्याचे सांगत, दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या 'उद्धव आणि आदित्यला सांभाळा' या शेवटच्या इच्छेची आठवण खासदारांना करून देण्यात आली आहे. या पत्राने धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या पत्रावर सुधाकर पाटील, जेष्ठ शिवसैनिक अशोक सांगवे, बसवराज वरनाळे, रणधीर पवार, अब्दुल रझाक अत्तार, विजयकुमार नागणे, विजयकुमार तळभोगे, सिद्धराम हत्तरगे, अप्पाराव गायकवाड, जगदिश निंबरगे,  संतोष नाईक, मारुती थोरे, संगमेश्वर  स्वामी, दत्तात्रय शिंदे आदी शिवसैनिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.