T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात
esakal June 22, 2026 02:45 AM

महिला टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत रविवारी (२१ जून) भारतीय महिला संघाला पराभवाचा मोठा धक्का बसला. दक्षिण आफ्रिका महिला संघाने भारतीय महिला संघाला मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात ६ विकेट्सने पराभूत केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय आहे, तर भारतीय संघाचा तीन सामन्यांतील पहिलाच पराभव आहे. मात्र आता अ गटात चूरस निर्माण झाली आहे.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर भारताने १५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने १९.१ षटकात ४ विकेट्स गमावत १६१ धावा करत सहज पूर्ण केला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयात अष्टपैलू मारिझान कापने मोलाचा वाटा उचलला. तिने महत्त्वाच्या विकेट्स घेण्यासोबतच मॅचविनिंग अर्धशतक केले. भारताला या सामन्यात झेल घेण्याच्या संधी सुटल्याचाही फटका बसला.

दरम्यान, या पराभवानंतरही भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेपेक्षा चांगला नेट रन रेट असल्याने गुणतालिकेत दोन्ही संघांचे ४ गुण असले तरी भारत दुसऱ्या क्रमांकावर काय आहे, तर दक्षिण आफ्रिके तिसऱ्या क्रमांकावर आहे. अ गटात अव्वल क्रमांकावर सध्या ऑस्ट्रेलिया असून त्यांनी पहिल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. सेमीफायनलमध्ये अव्वल दोन संघच जाणार आहेत. आता दक्षिण आफ्रिकेचे पुढचे सामने नेदरलँड्स आणि बांगलादेशविरुद्ध होणार आहेत. तसेच भारताला बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामने खेळायचे आहेत. दरम्यान आता सेमीफायनसाठी दावेदारी ठोकायची असेल, तर भारताला पुढचे दोन्ही सामने जिंकावेच लागतील. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या निकालांवरही अवलंबून रहावे लागणार आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील सामनाही महत्त्वाचा असेल, हा सामनाही अखेरच्या क्षणी अनेक सेमीफायनलची समीकरणे बदण्याची शक्यता आहे.

दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वूल्फार्ट आणि ताझमिन ब्रिट्स यांनी सुरुवात संथ केली होती. भारतीय गोलंदाजांनी त्यांना पॉवरप्लेमध्ये खूप मोठे फटके मारू दिले नव्हते. याच दबावात ६ व्या षटकात वूल्फार्टने विकेट गमावली. श्री चरणीने स्वत:च्याच गोलंदाजीवर २० धावांवर तिचा झेल घेतला. याच षटकात श्री चरणीने ऍनेरी डर्कसनलाही शून्यावर त्रिफळाचीत करत दक्षिण आफ्रिकेला दुहेरी धक्के दिले होते. त्यामुळे भारताचा आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र गोलंदाजीत कमाल केल्यानंतर फलंदाजीतही मारिझान कापने तिची छाप पाडली. तिने ब्रिट्ससोबत दमदार भागीदारी करत संघाला विजयाच्या दिशेने नेले.

एक बाजू ब्रिट्सने सांभाळलेली असतानाच दुसऱ्या बाजूने काप आक्रमक खेळत होती. तिला बाद करण्याच्या काही संधीही भारतीय संघाने गमावल्या. कापने ३४ चेंडूत अर्धशतकही केले. तिच्या आणि ब्रिट्सच्या भागीदारीने भारताला बॅकफुटवर ढकलले होते. पण त्यांची ९७ धावांची भागीदारी १७ व्या षटकात शफाली वर्माने तोडली. तिने ब्रिट्सला ३६ चेंडूत ४० धावांवर असताना बाद केले. तिचा झेल श्री चरणीने पकडला. त्यापाठोपाठ १८ व्या षटकात श्री चरणीने नादीन डी क्लर्कलाही ५ धावांवर बाद केले. त्यामुळे सामन्यात रोमांच उभा राहिला होता. परंतु, मारिझान कापने लय बिघडू दिली नाही. तिला शेवटी क्लो ट्रायॉनने साथ दिली. ट्रायॉनने विजयी चौकार मारला. मारिझान काप ४५ चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांसह ८१ धावांवर नाबाद राहिली. ट्रायॉन १० धावांवर नाबाद राहिली. मारिझान कापचा हा आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील सर्वोत्तम स्कोअर होता.

भारताकडून श्री चरणीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच शफाली वर्माने १ विकेट घेतली.

तत्पुर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय महिला संघाने २० षटकात ७ बाद १५८ धावा केल्या होत्या. भारताकडून शफाली वर्माने १५ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकारासह सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौरने २४ धावांची आणि दीप्ती शर्माने २९ धावांची खेळी केली. बाकी कोणाला २० धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. स्मृती मानधना (१७), यास्तिका भाटीया (१५), जेमिमाह रोड्रिग्स (१२) आणि रिचा घोष (१५)यांना सुरुवात चांगली मिळाली, पण मोठी खेळी करता आली नाही.

दक्षिण आफ्रिकेकडून मारिझान काप आणि शबनीम इस्माईल यांनी चांगली गोलंदाजी करताना प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच आयाबोंगा खाका, नादीन डी क्लर्क, नॉनकुलुलेको एमबाला यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.