विधान परिषद निवडणुकीच्या 11 जागांच्या मतमोजणीत महायुतीने अनेक ठिकाणी आघाडी घेतली असताना नाशिकमधून मात्र अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल समोर आला आहे. नाशिक विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
गोकुळ गीते यांनी सुरुवातीपासूनच आपली उमेदवारी कायम ठेवली होती. त्यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर पेच निर्माण झाला होता. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गीते यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही. त्यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेणार नसल्याचे जाहीर केले होते, तरी त्यांच्या समर्थकांकडून स्थानिक स्तरावर प्रचार सुरू असल्याची चर्चा होती.
मतमोजणीच्या दिवशी सकाळीच गोकुळ गीते मतमोजणी केंद्रावर दाखल झाले होते. यावेळी त्यांनी स्वतः प्रचार केला नसला तरी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केल्याचा दावा करत विजयाचा विश्वास व्यक्त केला होता.
दरम्यान, मतमोजणी सुरू होण्यापूर्वीच महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली. काही काळ मतमोजणी केंद्र परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
निकाल जाहीर झाल्यानंतर गोकुळ गीते यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. यानंतर नरेंद्र दराडे यांनी नाराजी व्यक्त करत गंभीर आरोप केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अपवाद वगळता महायुतीतील इतर नेत्यांनी आपला राजकीय घात केल्याचा दावा त्यांनी केला. तसेच विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या गीते समर्थकांवर संताप व्यक्त करत त्यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिल्याचे सांगितले जात आहे.
या निकालामुळे नाशिकमधील महायुतीच्या अंतर्गत राजकारणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी काळात याचे राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.