पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई! सायन सबवेमध्ये गुडघाभर पाणी, वाहतूक ठप्प; मुंबई महानगरपालिकेच्या दाव्यांचा बट्ट्याबोळ, आजचा हवामानाचा अंदाज काय?
एबीपी माझा वेब टीम June 24, 2026 09:43 AM

Mumbai Rains : राज्यासह मुंबईत जोरदार पावसाने बॅटिंग केली आहे. त्यामुळे उकाड्या पासून हैराण नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे मुंबईतील मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसाने मुंबईची अक्षरशः तुंबई झाल्याचे बघायला मिळाले आहे. सायन हायवे लगतच्या एव्हरार्ड नगर येथील सबवेमध्ये (Sion subway) मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने (Water Accumulated near Sion Highway)  नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सबवे पूर्णपणे जलमय झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पंपाच्या साहाय्याने पाणी उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. दरवर्षी पावसाळ्यात या भागात पाणी तुंबण्याची समस्या समोर येते. मात्र, यंदाही पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने प्रशासनाच्या मान्सूनपूर्व कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. परिणामी तुंबलेल्या पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावं लागत आहे. (Water Accumulated near Sion Highway) 

Mumbai Rains : जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे देखील पाण्याखाली; पहिल्याच पावसात नाले सफाईची पोलखोल

दुसरीकडे, पूर्व उपनगरात मध्य रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला आहे, परंतु काही ठिकाणी पाणी भरल्याचे समजते आहे. मुंबईत मध्यरात्री पासून सुरू असलेला जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे देखील पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवेमध्ये तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून अंधेरी गोखले पुलाचा वापर करा, असे आवाहन वाहन चालकांना केला जात आहे. ईशान्य मुंबईसह उपनगरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग केली आहे. भांडुप आणि इतर भागात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. परिणामी पहिल्याच पावसात नाल्यांची सफाईबाबतची पोलखोल झाली आहे. नाल्यातून सर्व पाणी रस्त्यावर आलं असून दुर्गंधी पसरली आहे. भांडुप कोकण नगर विभागात सकल भागात पाणी साचल्याचे देखील चित्र आहे.

Mumbai Rains : ऐवराव्ड नगर भूयारी मार्गात गळतीला सुरूवात

मुंबई महापौर रितू तावडे यांस प्रभाग क्र 170 चे माजी नगरसेवक कप्तान मलिक यांनी दिनांक 20 मे 2026 रोजी भूयारी मार्ग डागडुजी करण्याबाबत लेखी निवेदन देण्यात आले होते, परंतू त्या निवेदनकडे दुर्लक्ष केल्याने भूयारी मार्गात पाणी गळतीमुळे पाणी साचलेले दिसून आले. कप्तान मलिक यांनी महापौर रितू तावडे यांस आवाहन केले होते कि, आपण संबंधित अधिकाऱ्याला घेऊन भूयारी मार्गाची पाहणी करून भूयारी मार्ग लवकरात लवकर डागडुजी करण्यात यावेत, जेणेकरून के जे सोमय्या रुग्णालयातील कर्मचारीवर्ग,रुग्ण व त्यांचे नातेवाईक, जेष्ठ नागरिक,शाळेकरी व महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना, स्थानिक नागरिक पावसाळ्यात भूयारी मार्गांमधून पाण्यातून कसंरत करून ये जा करावे लागते. मात्र या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याने परिणामी भूयारी मार्गात पाणी गळतीमुळे पाणी साचल्याचे चित्र आहे.

Mumbai Rains News : भिवंडी शहर व ग्रामीण भागात रात्रीपासून पावसाची रिपरिप; वीज खंडित झाल्याने नागरिक त्रस्त

भिवंडी शहरासह ग्रामीण भागात काल (23 जून) रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू असून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काल सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे भिवंडी ग्रामीण भागातील कवाड, दुमडापाडा आणि परिसरातील अनेक गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झाला आहे.

दरम्यान, गेल्या तब्बल 16 तासांपासून वीज नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. मोबाईल चार्जिंग, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि दैनंदिन कामांवर त्याचा परिणाम होत आहे. दरम्यान, टोरंट पॉवर कंपनीकडून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळत आहे. एकीकडे पावसामुळे वातावरण आल्हाददायक झाले असले तरी दीर्घकाळ वीज खंडित राहिल्याने ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.