शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून फुटून शिंदे गटात दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यातील संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. ईशान्य मुंबईत ठाकरे सेना आणि शिंदे सेना आमनेसामने आल्याचे चित्र असून, या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र पाठवत संजय दिना पाटील यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत.
संजय राऊत यांनी पाठवलेल्या पत्रात महाराष्ट्रातील जनतेमध्ये पक्षफुटीबाबत मोठा संताप असल्याचा उल्लेख केला आहे. पक्षातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांविरोधात राज्यभर आंदोलन होत असून, नागरिकांना लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचा घटनात्मक अधिकार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
राऊत यांनी आपल्या पत्रात दावा केला आहे की, ईशान्य मुंबईतील खासदार संजय दिना पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना धमकीची भाषा वापरली. “माझ्या विरोधात आंदोलन करण्याआधी जिवाचा विमा काढून घ्या. मी तुम्हाला स्मशानात किंवा हॉस्पिटलमध्ये पाठवीन,” असे वक्तव्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
याशिवाय, पत्रात आणखी गंभीर आरोपांचा उल्लेख करण्यात आला आहे. “मी याआधी पाच लोकांना ठार केले आहे,” असा दावा संजय दिना पाटील यांनी केल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. या वक्तव्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि संबंधित व्यक्तींविषयी माहिती समोर आणावी, अशी मागणीही त्यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
तसेच, “माझ्याविरोधात कोणी आंदोलन केले तर त्यांच्यावर बॉम्ब टाकेन, घरात घुसून मारेन,” अशा प्रकारच्या धमक्या दिल्याचाही आरोप राऊत यांनी आपल्या पत्रातून केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान, या आरोपांमुळे मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, संजय दिना पाटील यांच्याकडून यावर काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच या प्रकरणावरून ठाकरे गट आणि शिंदे गटातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.