सांगवडे पूल अंतिम टप्प्याकडे
esakal June 26, 2026 07:45 PM

सोमाटणे, ता. २६ : पवना नदीवरील सांगवडे पुलाचे काम सध्या वेगाने सुरू असून, यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्याने नदीपात्रातील आधारस्तंभांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यातही कामात खंड न पडता पुलाचे बांधकाम नियोजित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
सांगवडे, मामुर्डी आणि गहुंजे गावांतील दळणवळण सुलभ करण्यासाठी या पुलाची मागणी ग्रामस्थांकडून गेल्या पन्नास वर्षांपासून सातत्याने करण्यात येत होती. मात्र, त्याकडे लक्ष दिले गेले नव्हते. दरम्यान, कुंडमळा येथील लोखंडी पूल पाण्याच्या प्रवाहात कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर शासनाने या प्रश्नाची गंभीर दखल घेतली. त्यानंतर महापालिकेच्या आर्थिक सहकार्याने पवना नदीवरील सांगवडे पुलाच्या उभारणीस मंजुरी मिळाली आणि गेल्या वर्षी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.
या पुलाची एकूण लांबी १६६ मीटर असून त्यापैकी १४१ मीटर भाग नदीपात्रात आहे. पुलाची एकूण रुंदी १५ मीटर असून नदीपात्रातील रुंदी १२ मीटर आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३७ कोटी २५ लाख ९१ हजार ३६६ रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पुलाचे काम पूर्ण करण्याची मुदत ४ ऑगस्ट २०२७ निश्चित करण्यात आली असून, ती लक्षात घेऊन कामाचा वेग वाढविला आहे. सध्या नदीपात्रातील सर्व स्तंभांचे काम पूर्ण झाले असून, मामुर्डी बाजूच्या जोडरस्त्यासह पुलाच्या बांधकामाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे.

या वर्षी मान्सून लांबल्याने नदी पात्रातील आधारस्तंभाचे काम वेळेत पुर्ण झाले असून पुलाच्या पुढील भागाचे काम वेगाने सुरु असल्याने मुदतीपुर्वीच हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. काम पुर्ण झाल्यानंतर पवनमावळ पुर्व भागातील गावांचा मामुर्डीमार्गे पिंपरी-चिचंवड, पुण्याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.
- रोहन जगताप, सरपंच सांगवडे


PNE26W29963

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.