ZIM vs BAN 1st Test: २७ धावांत ८ विकेट्स... बांगलादेशची दुबळ्या झिम्बाब्वेसमोर शरणागती; Newman Nyamhuri ने वाट लावली Video
esakal June 28, 2026 10:45 PM

Bangladesh dramatic collapse from 113 for 2 to 140 all out: इंग्लंड-न्यूझीलंड, वेस्ट इंडिज-श्रीलंका यांच्यातल्या कसोटी सामन्यांची चर्चा असताना झिम्बाब्वेने सर्वांना आपल्या कामगिरीने आश्चर्याचा धक्का दिला आहे. बांगलादेशचा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलाय आणि पहिल्या कसोटीत यजमानांनी बांगलादेशची पार वाट लावली आहे. झिम्बाब्वेने दुपारच्या जेवणानंतरच्या सत्रात वेगवान गोलंदाजीचा जबरदस्त नमुना सादर करत आठ बळी टिपले आणि सामन्यावर पूर्ण वर्चस्व मिळवले.

सलामीवीर महमुदूल जॉय ( २) न्यूमन न्यामहूरीच्या गोलंदाजीवर बाद झाल्यानंतर शदमन इस्लाम ( २०) व मोमिनूल हक ( ६०) यांनी चांगला खेळ केला. पण, न्यूमन न्यामहूरीने सेट झालेला फलंदाज मोमिनुल हकचा बळी घेत महत्त्वाची भागीदारी तोडली, तर त्यानंतर ब्रॅड इव्हान्सने नजमुल हुसेन शांतोला बाद केले. त्यानंतर रिचर्ड नगारवाने चेंडूला जबरदस्त स्विंग देत घातक गोलंदाजी केली. त्याने अचूक यॉर्करवर मुशफिकुर रहीमचा त्रिफळा उडवला आणि पदार्पण करणाऱ्या हृदोयचा झेल यष्टिरक्षकाकडे देण्यास भाग पाडले.

WI vs SL 1st Test: आमिर जांगू-रोस्टन चेस यांनी क्रिकेटचा इतिहास-भूगोल बदलला... १४९ वर्षांत घडला नव्हता असा पराक्रम गाजवला

चेंडूच्या सततच्या हालचालीसमोर बांगलादेशच्या फलंदाजांकडे कोणतेही उत्तर नव्हते आणि परिणामी त्यांची धावसंख्या २ बाद ११३ वरून १४० धावांत सर्वबाद अशी घसरली.झिम्बाब्वेच्या प्रभावी वेगवान गोलंदाजीमुळे त्यांची पडझड झाली; त्यांनी फलंदाजांना स्थिरावण्याची अजिबात संधी दिली नाही. झिम्बाब्वेच्या क्षेत्ररक्षकांनीही गोलंदाजांना उत्तम साथ दिली; त्यांनी चपळ आणि अचूक झेल घेत प्रत्येक संधीचे सोने केले. न्यूमन न्यामहूरीने १२.२-१-६१-४ अशी स्पेल टाकली. त्याला रिचर्ड, ब्रॅड इव्हान्स व ब्लेसिंग मुझारबानी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत चांगली साथ दिली.

प्रत्युत्तरात झिम्बाब्वेने १२.३ षटकांत बिनबाद ६६ धावा केल्या आहेत. हे वृत्त लिहिले तेव्हा इनोसेंक काइआ ३७ व बेन कुरन २९ धावांवर खेळत होते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.