Alandi Charholi Bypass: आळंदी-चऱ्होली बाह्यवळण रस्ता खड्ड्यांनी विदीर्ण; ३९२ लाखांचा निधी मंजूर असूनही काम ठप्प, वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
esakal June 28, 2026 10:45 PM

आळंदी : आळंदी-चऱ्होली खुर्द येथील बाह्यवळण रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. धानोरे-मरकळ औद्योगिक विभागाला जोडणाऱ्या बाह्यवळण मार्गावरील खड्ड्यांमुळे औद्योगिक विभागाला मोठा फटका बसत आहे. दुचाकी, छोट्या चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत. वर्षभरापूर्वी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून या रस्त्यासाठी 392.83 लाख रुपये अंदाजपत्रकामध्ये प्रशासकीय मान्यता देऊनही अद्याप रस्त्याचे काम मार्गी लागले नाही.

सध्या पावसामुळे या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत आहे. पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही, ज्यामुळे अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यातच रस्ता परिसरात चिखल झाल्याने दुचाकी वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. या चिखलातून आणि साचलेल्या पाण्यातून वाहने वेगाने गेल्यास रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर चिखल आणि घाणेरडे पाणी उडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

काही महिन्यांपूर्वीच चऱ्होली खुर्द ते चऱ्होली बुद्रुक येथील बारा मीटर रुंदीच्या इंद्रायणी पुलाच्या दुरुस्तीचे काम तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून जवळपास 78.09 लाख रुपये खर्च करून पूर्ण झाले होते. आळंदी ते चऱ्होली 18 मीटर रुंद आणि दोन किलोमीटर लांबीच्या बाह्यवळण रस्त्यासाठी 392.83 लाख रुपये अंदाजपत्रकीय तरतूद करून प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. याबाबत 31 जुलै 2025 रोजी पुण्यात आयुक्त कार्यालयात बैठक झाली होती. मात्र, पुलाजवळील या मुख्य बाह्यवळण रस्त्यावरील खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने आळंदी परिसरातील नागरिकांबरोबरच मरकळ, धानोरे, भोसरी औद्योगिक भागात जाणाऱ्या उद्योग जगताकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

खड्ड्यांमध्ये चारचाकी वाहने जोरात आदळत असल्याने वाहनांचे टायर्स आणि इतर महागडे सुटे भाग निकामी होत आहेत. अनेकदा वाहने रस्त्यातच बंद पडत असल्याने वाहनचालकांना ती गॅरेजमध्ये न्यावी लागत आहेत. तर दुचाकी चालकांना कंबरेला तसेच मानेला जोराचा झटका बसत आहे.

संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी प्रस्थान सोहळा आता अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपला आहे. या काळात या मार्गावरून वारकरी आणि भाविकांची मोठी वर्दळ असते. असे असतानाही आळंदी-चऱ्होली बाह्यवळण रस्ता, आळंदी-मरकळ रस्ता तसेच आळंदी-हनुमानवाडी रस्त्यावरील खड्ड्यांकडे प्रशासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. पालखी सोहळ्यापूर्वी हे खड्डे तातडीने आणि दर्जेदार पद्धतीने बुजवणे अपेक्षित आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.