आळंदी : संतपरंपरा... भाविकांप्रती सेवाभाव... आणि प्रभावी संवाद साधत स्वयंशिस्त व जबाबदारीने काम करून मंदिरात येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सेवा नम्रतेने कशी दिली जाईल, याचे मार्गदर्शन आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील कर्मचाऱ्यांना देण्यात आले. नुकतेच मागील महिन्यात दानपेटीतील पैशांच्या चोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर देवस्थानाची प्रतिमा आपल्या वागणुकीमुळे मलिन होऊ न देता दर्शन व्यवस्था आणि स्वच्छतेबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन काळाची गरज ओळखून आळंदी देवस्थानने कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणण्यासाठी स्तुत्य उपक्रम राबवला.
आळंदी देवस्थानात मंदिर व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, दर्शन व्यवस्थापन, गर्दी नियंत्रण आणि भाविकांना अधिक समाधानकारक अनुभव देण्याच्या उद्देशाने देवस्थानातील कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शुक्रवारी (ता. 26) देण्यात आले. हा प्रशिक्षण कार्यक्रम दोन टप्प्यांत घेण्यात आला असून, देवस्थानात कार्यरत असलेल्या एकूण 57 कर्मचाऱ्यांनी त्यामध्ये सहभाग घेतला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन पुण्यातील सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांच्या हस्ते झाले. यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड. रोहिणी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमात प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, योगी निरंजन नाथ, ॲड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कबीर यांचेही पाठबळ लाभले आहे.
व्यवस्थापन क्षेत्रातील अनुभवी डॉ. अभय कुलकर्णी, डॉ. श्रीकांत कल्लूरकर आणि डॉ. सुधीर हसमनीस यांनी दोन्ही प्रशिक्षण सत्रांमध्ये मार्गदर्शन केले. संपूर्ण प्रशिक्षण सोप्या आणि सहज समजणाऱ्या मराठी भाषेत, भक्तिरसाने ओतप्रोत वातावरणात पार पडले. प्रशिक्षणादरम्यान ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या, भक्तीगीते, मंदिरातील प्रत्यक्ष उदाहरणे, संवादात्मक उपक्रम आणि दैनंदिन कामाशी संबंधित प्रसंगांचा प्रभावी वापर करण्यात आला. त्यामुळे प्रशिक्षण अत्यंत जीवंत, उत्साही आणि सहभागी स्वरूपाचे झाले.
प्रशिक्षणाच्या शेवटी सर्व सहभागी कर्मचाऱ्यांनी 'माऊलींच्या सेवकाची शपथ' घेऊन प्रत्येक भाविकाशी आदराने वागण्याची, सेवेला पूजेचे स्वरूप मानण्याची, देवस्थानाच्या परंपरांचा सन्मान राखण्याची आणि देवस्थानाची प्रतिष्ठा वृद्धिंगत करण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याची प्रतिज्ञा केली.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोथळीकर यांनी प्रशिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, 'देवस्थानात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित, शिस्तबद्ध आणि समाधानकारक दर्शन अनुभव मिळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. योग्य प्रशिक्षणामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल, सेवा अधिक परिणामकारक होईल आणि भाविकांच्या समाधानात निश्चितच भर पडेल.'
याबाबत आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी सांगितले, "प्रशिक्षणाची संकल्पना अशी होती की प्रत्येक कर्मचारी हा देवस्थानाचा प्रतिनिधी असून प्रत्येक भाविकामध्ये माऊलींचे रूप पाहून सेवा करावी. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी दर्शनासाठी जगभरातून अनेक भाविक येतात. अशावेळी भाविकांशी नम्रतेने संवाद साधणे, देवस्थानच्या विविध उपक्रमांबद्दल माहिती देणे तसेच संत साहित्य, संत जीवन याबाबत माहिती देणे यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. व्यवस्थापन क्षेत्रातील 40-50 वर्षे अनुभव असलेल्या तज्ज्ञांचे मार्गदर्शन यावेळी देण्यात आले. भाविकांप्रती सेवाभाव, स्वच्छता आणि दर्शन व्यवस्था याबाबतचा प्रोटोकॉल कर्मचाऱ्यांनी पाळणे गरजेचे आहे."