Maharashtra Weather Forecast Today IMD : राज्यात दाखल झालेल्या मॉन्सूनने (Monsoon) गेल्या काही दिवसापासून विश्रांती घेतल्याचे बघायला मिळाले होते. तर मॉन्सूनच्या पावसाने (Maharashtra Rain) गंती संथ केल्याने पावसाची बळीराजासह साऱ्यांना पावसाची प्रतिक्षा लागून राहिली होती. अशातच पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याचे बघायला मिळते आहे. मुंबई, उपनगरसह ठाण्यात रविवारच्या रात्री तुफान पावसाला सुरुवात झाली. ठाण्यात रात्री 11 नंतर जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या. अवघ्या एका तासात 29 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. (Maharashtra Rain Alert)
दुसरीकडे, हवामान विभागाच्या अंदाजानुसार (Weather Forecast Today IMD) राज्यात 22 जिल्ह्यांत पावसाची शक्यता असून, 2 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर 20 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. परिणामी महाराष्ट्रात आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून हवामान विभागाने चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
Maharashtra Weather Forecast : भारतातील विविध भागांत पावसासाठी पोषक हवामान प्रणाली कार्यरत
नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) पुढील काही दिवसांत देशाच्या आणखी काही भागांत पुढे सरकण्याची शक्यता असून, त्यामुळे अनेक क्षेत्रांत पावसाचा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवसांत मान्सून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या आणखी काही भागांत प्रगती करण्याची शक्यता आहे. मान्सूनची प्रणाली अधिक बळकट होत असून, भारतातील विविध भागांत पावसासाठी पोषक अशा अनेक हवामान प्रणाली कार्यरत असल्याचे हवामान विभागाने नमूद केले.
महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे; हवामान विभागाने 28 जून ते 4 जुलै या कालावधीत कोकण आणि गोव्यात बऱ्यापैकी सर्वत्र पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता असून, काही भागांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम भारतातील इतर भागांत मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे.
Sangole Rain : दुष्काळीच्या झळा सोसणाऱ्या सांगोल्यात जोरदार पाऊस
गेले अनेक दिवसापासून दुष्काळीच्या झळा सोसणाऱ्या सांगोल्यात आज जोरदार पाऊस बरसला असून आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर भर पावसात पोचले . आज सांगोल्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण होते. याच आनंदात सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे देखील शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी बांधावर पोचले. सांगोला तालुक्यातील कमलापूर येथे बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. शेतकरी बऱ्याच दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असताना आज सांगोल्या दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
Nagpur Rain: पेरणीच्या तोंडावर वीज कोसळून बैलजोडीचा मृत्यू
पेरणीच्या तोंडावर वीज कोसळून बैलजोडीचा मृत्यू झाल्यानंतर देखील न खचता शेतकऱ्याने एका बैलाच्या सोबतीने स्वतःच्या खांद्यावर आऊत घेऊन सोयाबीन पिकाची पेरणी केल्याची हृदयद्रावक घटना नागपूर जिल्ह्यातून पुढे आली आहे. भिवापूर तालुक्यातील सेलोटी गावात 25 जूनला आलेल्या पावसासह परिसरात मोठया प्रमाणात विजा कोसळल्या होत्या, यात तानबा मरघडे या शेतकऱ्यांच्या शेतात बांधून असलेल्या बैलजोडीचा मृत्यू झाला. खरीप हंगामाच्या तोंडावर घडलेल्या घटनेने तानबा मरघडे यांच्यावर मोठे संकट ओढवले होते. नवीन बैलजोडी घ्यायला पैसे नसल्याने त्यांनी स्वतःच्या खाद्याने पेरणी करण्याचा निर्णय घेतला.मित्राकडून आणलेला एक बैल व एका बाजूने ते अशा प्रकारे चार एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली.
दरम्यान, 'विजेमुळे माझी बैलजोडी मृत पावली, यात माझे एक लाखाचे नुकसान झाले. शासनाची मदत मिळेल तेव्हा मिळेल, मात्र आता पेरणीच्या तोंडावर पैसे नसल्याने आपल्याला हे पाऊल उचलावे लागल्याचे तानबा मरघडे यांनी सांगितले.
Rain News : भिवंडी शहर व ग्रामीण भागात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे पुनरागमन
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात चार दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाडा आणि दमट हवामानापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागातील काही ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शहरातील सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. दुसरीकडे, धरण क्षेत्रात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शहरात पाणीकपात सुरू आहे. त्यामुळे धरण परिसरातही जोरदार पाऊस होऊन पाणीसाठ्यात वाढ व्हावी आणि नागरिकांना पाणीटंचाईतून दिलासा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.