'मिसिंग लिंकच्या मोठ्या बोगद्यात आम्ही सगळे...', अतुल कुलकर्णी संतापले, कोणतेही आढेवेढे न घेता थेटच म्हणाले...
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क June 29, 2026 10:13 AM

Atul Kulkarni Facebook Post: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) दमदार अभिनेते म्हणून अतुल कुलकर्णी (Marathi Actor) यांची ओळख आहे. ते मराठी (Marathi Films), हिंदीसह तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे अभिनेते, पटकथालेखक आणि निर्माते आहेत. पण, अभिनयासोबतच ते एक जागरूक नागरिक म्हणूनही समाजातील विविध घडामोडींवर आपलं स्पष्ट मत मांडत असतात. अन्याय, गैरप्रकार किंवा व्यवस्थेतील त्रुटींवर ते सातत्यानं भाष्य करताना दिसतात. सध्या त्यांच्या एका फेसबुक पोस्टची जोरदार चर्चा रंगलीय. या पोस्टमधून त्यांनी सर्वसामान्य नागरिक नियमांचं काटेकोर पालन करत असताना, सत्ताधारी आणि राजकारणी मात्र त्याच नियमांना केराची टोपली दाखवत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 

अतुल कुलकर्णी नेमकं काय म्हणाले? (Atul Kulkarni On Politics)

अतुल कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय की, "भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार. म्हणजे फक्त "पैसे खाणं" म्हणजेच भ्रष्टाचार नव्हे. नाही का? भ्रष्ट बोलणं, भ्रष्ट वागणं म्हणजे देखील 'भ्रष्टाचारच' हो ना? काल मिसिंग लिंकच्या मोठ्या बोगद्यात आम्ही सगळे "सामान्य नागरिक" नियमानुसार 80ची वेगमर्यादा पाळून जात असता कुणा सत्ताधारी व्यक्तीच्या गाड्या (नेमकं कोण ते कळालं नाही, पण ते कुणीही असलं तरी फारसं वेगळं असलं असतं असं वाटत नाही), आम्हाला सायरनच्या धमक्या देत 110, 120 च्या वेगानं निघून गेल्या…"

"हे होत असता, मी नेमकं आपले वेगवेगळे राजकारणी गेल्या काही दिवसांत काय, काय भाषेत बोललेत, किंवा एरवीही किती खालच्या दर्जाची भाषा वापरतात ह्या संदर्भात काही वाचत होतो… भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्ट आचार. भ्रष्ट बोलणं, भ्रष्ट वागणं म्हणजे देखील 'भ्रष्टाचारच'. हो नं? की म्या पामराचं चुकतंय काही? माझ्या ह्या वक्तव्यामुळे 'जर' कुणा राजकारण्यांच्या भावना दुखावल्या असतील 'तर'(च) मला क्षमा करा", असंही अतुल कुलकर्णी यांनी पोस्टमध्ये म्हटलंय.                                                                              

Bollywood Actress Life Story: कधीकाळी बॉलिवूड गाजवलं, पण लग्नानंतर सगळं सोडून संसाराला लागली; आज 120 कोटींच्या साम्राज्याची मालकीण, 700 लोकांना दिलाय रोजगार

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.