FIFA World Cup 2026 : रोनाल्डोच्या पोर्तुगालला गोल करण्यात अपयश; गोलशून्य बरोबरीसह कोलंबिया विश्वकरंडकाच्या के गटात अव्वल
esakal June 29, 2026 03:45 PM

मियामी - मागील लढतीत उझबेकिस्तानवर तब्बल पाच गोल डागलेला पोर्तुगाल संघ आणि त्यांचा सुपरस्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला कोलंबियाविरुद्धच्या लढतीत अचूक नेम साधण्यात अपयश आले. परिणामी विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या के गटातील लढत गोलशून्य बरोबरीत राहिली.

कोलंबियाची ही स्पर्धेतील पहिली बरोबरी ठरली. अगोदरचे दोन्ही सामने जिंकलेल्या दक्षिण अमेरिकन संघाने सात गुणांसह के गटात अव्वल स्थान मिळविले. कोंगो डीआरविरुद्ध, तसेच आता पुन्हा एक गुण मिळालेल्या पोर्तुगालचे एक विजय व दोन बरोबरीमुळे पाच गुण झाले व त्यांना गटात दुसरा क्रमांक मिळाला. अन्यत्र उझबेकिस्तानला ३-१ असे पराभूत केलेल्या कोंगो डीआरने पहिल्या विजयासह चार गुण नोंदवून कोलंबिया व पोर्तुगालसह गटातून राउंड ऑफ ३२ फेरीत प्रवेश केला.

कोलंबियाने गोल करण्याच्या संधी गमावल्या असल्या, तरी सामन्यात बलाढ्य युरोपियन संघावर वर्चस्व राखल्याचे समाधान त्यांना नक्कीच लाभले. बाद फेरीत ते घानाविरुद्ध खेळतील, तर पोर्तुगालसमोर क्रोएशियाचे आव्हान असेल.

सामन्याच्या पहिल्याच मिनिटास कोलंबियाच्या जॉन कोर्दोबा याचे हेडिंग किंचित वरून गेले, तर १७ व्या मिनिटास कोर्दोबा याचा धोकादायक प्रयत्न पोर्तुगालचा दक्ष गोलरक्षक दियोगो कॉस्ता याने वेळीच रोखला. ३९व्या मिनिटास पोर्तुगीज ब्रुनो फर्नांडिसला गोलनेटसमोर आयती संधी होती, पण कोलंबियाच्या कामिलो व्हर्गास याने ऐनक्षणी दक्षता प्रदर्शित केल्यामुळे गोलशून्य बरोबरी कायम राहिली. कोलंबियाच्या जॉन अरियास, जेम्स फर्नांडिस यांनी पोर्तुगालच्या बचावफळीवर दबाव टाकला. सामन्याचा मानकरी ठरलेला पोर्तुगीज गोलरक्षक दियोगो कॉस्ता याने सहा फटके चपळाईने अडविले.

ख्रिस्तियानो रोनाल्डो याने उझबेकिस्तानविरुद्ध मागील लढतीत दोन गोल करून सलग सहा विश्वकरंडक स्पर्धेत गोल करण्याचा विक्रम रचला होता, मात्र हा ४१ वर्षीय सुपरस्टार खेळाडू कोलंबियाविरुद्ध बेसूर ठरला. त्यामुळे स्टेडियमवरील चाहते निराश झाले. रोनाल्डोने एकच चांगला फटका मारला, पण २४व्या मिनिटास फ्रीकिकवर चेंडू थेट गोलरक्षक कामिलो व्हर्गास याच्या हाती गेला.

सामन्याच्या भरपाई वेळेतील पहिल्या मिनिटास कोलंबियाच्या डेव्हिन्सन सांचेझ याच्या हेडरवर चेंडूने गोलनेटमध्ये जागा मिळविली होती, पण व्हीएआर पडताळणीत किंचित ऑफसाईडवर शिक्कामोर्तब झाल्यामुळे कोलंबियाला गोलसह आघाडीचा आनंद साजरा करणे शक्य झाले नाही आणि त्यांच्या चाहत्यांचा जल्लोष अर्धवट राहिला.

दृष्टिक्षेपात...

  • पोर्तुगालतर्फे ख्रिस्तियानो रोनाल्डोचा २५वा विश्वकरंडक सामना, जर्मनीच्या लोथार मथायसशी बरोबरी, अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीनंतर (२९ सामने) दुसरा क्रमांक

  • २०२६ विश्वकरंडकात गोलशून्य बरोबरीत राहिलेला सातवा सामना

  • विश्वकरंडक स्पर्धेत कोलंबियाची पहिलीच गोलशून्य बरोबरी

‘माझ्या मते, कोलंबियाने सुरुवातीपासून अखेरपर्यंत उत्कृष्ट खेळ केला. विजयासाठी आम्ही पूर्णतः हक्कदार होतो. आम्ही अनेक गोलसंधी निर्माण केल्या, पण त्यांचे गोलमध्ये रूपांतर करण्यात कमी पडलो.’

- नेस्टर लॉरेन्झो, कोलंबियाचे प्रशिक्षक

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.