फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरून टाकणाऱ्या नसरापूर हत्याकांडाचा निकाल अखेर लागला आहे. आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुरड्या मुलील फूस लावून नेऊन आरोपी भीमराव कांबळे याने तिच्यावर अत्याचार केला. एवढंच नव्हे तर त्या क्रूर आरोपीने त्या बालिकेचा खून केला आणि तिचा मृतदेह गोठ्यात लपवूनही ठेवला.1 मे रोजी घडलेल्या या घटनेने सगळेच अक्षरश: हादरले. ही घटना उघड झाल्यावर संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणी राज्यभरात निदर्शनेही झाली. अखेर याप्रकरणी कोर्टाने आरोपी कांबळे याला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली.
या निकालाचे सर्वत्र स्वागत होत असून अशा नराधमांना वचक बसवण्यासाठी लवकरता लवकर फाशी व्हावी अशीही मागणी केली जात आहे. दरम्यान कोर्टाच्या या ऐतिहासिक निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. टीव्ही9 मराठी त्यांनी संवाद साधला. मी कोर्टाचं अभिनंदन करतो. अशा प्रकारच्या अममानवीय, अमानुष अशा कृत्याला आळा घालण्यासाठी, जरब बसवण्यासाठी फाशीचीच शिक्षा द्यावी यासाठी पोलिसांनी अशा प्रकारचा तपास केला होता. ज्या पोलिसांनी या केसच्या तपासात सहभाग घेतला ते एसपी असतील, डीजी असतील या सगळ्यांना धन्यवाद द्यायला पाहिजेत, असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
न्यायासाठी पोलिसांनी रात्रीचा दिवस केला
ही केस फास्टट्रॅकवर नेऊन, दोन आठवड्यांमध्ये चार्जशीटच सबमिशन केलं. या केसमध्ये तीन वेगवेगळ्य केस होत्या, पॉक्सोची एक होती, अत्याचाराची आणि मर्डरची अशा तीन केस होत्या. या तिन्ही केसमध्ये कोर्टाने या आरोपीला फााशीची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्रात इतक्या वेगाने, फास्ट शिक्षा होऊ शकते, हे ज्वलंत उदाहरण समाजासमोर गेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री, गृहविभागाच्या माध्यमातून देखील अतिशय उत्तम काम हे केलेलं आहे, ते स्वत: मॉनिटर करत होते, मी देखील डीजी,एसपी यांच्याशी वेळोवेळी बोलत होतो. त्यामुळे पोलिसांनी खऱ्या अर्थाने रात्रीचा दिवस करून ही जबाबदारी पार पाडली, विशेष करून पोलिसांच्या टीमचं देखील मनापासून अभिनंदन करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
नराधमांवर वचक बसवण्यासाठी, अशा प्रकारची वृत्ती गाडून टाकली पाहिजे, ठेचून टाकली पाहिजे यासाठी फाशीची आवश्यकता होती. म्हणूनच ही शिक्षा होऊ शकते, ही भीती नराधमांच्या मनात निर्माण होईल आणि तो वचक त्यांच्या मनात बसेल, असंही ते म्हणाले.