Ketan Agarwal Murder : केतनला लोहगडावरून ढकलण्यापूर्वी, सिया-चेतनने… चक्रावून टाकणारी माहिती समोर
Tv9 Marathi June 29, 2026 04:45 PM

महाराष्ट्रासह अख्ख्या देशाला हादरवणाऱ्या, सगळीकडे चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्याकांड (Ketan Agarwal Murder Case)  प्रकरणात आजचा दिवस ( सोमवार , 29 जून) अतिशय महत्वाचा आहे. या मर्डर मिस्ट्रीमधील प्रमुख आरोपी आणि केतनची होणारी पत्नी सिया गोयल तसेच तिचा मित्र चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. दोघांनाही आज वडगाव मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करण्यात येणार असून, तिथे पोलिसांकडून त्यांची कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात येऊ शकते. याच घटनेच्या तपासादरम्यान आता एक मोठी, हादरवणारी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्यामुळे याप्रकरणाला नवं वळण मिळू शकतं. 18 जून रोजी केतन याला लोहगडावरून ढकलून देण्याच्या आधी सिया गोयल हिने चेतन याला एक सीक्रेट कॉल केला होता. आणि त्यांचं फोनवरून बराच वेळ बोलणं झालं, अस उघड झालं आहे.

केतनला मारण्याच्या 34 मिनिटं आधी सियाचा चेतनला कॉल

पोलिसांकडून याप्रकरणाचा कसून तपास सुरू असून आत्तापर्यंत अनेकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसेच सिया आणि चेतन यांचे फोन ताब्यात घेऊन, त्यातील कॉल्स, चॅट्स, गुगल सर्च हिस्ट्री हे देखील तपासण्यात येत आहे. हत्येचं प्लानिंग करण्यासाठी त्यानी कुठून , काय तयारी केली हेही शोधून काढण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती आणखी काही महत्त्वपूर्ण पुरावे लागले आहेत. केतनला किल्ल्यावरून खाली फेकून देण्याच्या अवघ्या 34 मिनिटे आधी, सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यात फोनवर दीर्घ चर्चा झाली होती. सियाने चेतनला कॉल केला होता आणि ते दोघे बराच वेळ बोलले.या संभाषणादरम्यानच हत्येच्या अंतिम टप्प्यांची आखणी करण्यात आली होती असं समजतं.

सिया आणि चेतन या दोघांच्या ‘कॉल डिटेल रेकॉर्ड’ (CDR) मधून ही माहिती समोर आली आहे. केतनला संपवण्यासाठी शेवटचा सिग्नल देण्यासाठी अथवा कन्फर्मेशन देण्यासाठी दोघांचं फोनवरून बोलणं झालं असाव असा संशय व्यक्त होत आहे. या सीक्रेट कॉल दरम्यान सियाने आपण किल्ल्यावर नेमकं कुठे आहोत, त्याचं अचूकन लोकेशन चेतनला सांगितलं असावं. तसेच आपल्या आजूबाजूला इतर कोणी लोकं, कोणी पर्यटक नाहीत ना, याची खात्री करून घेतली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

केतनच्या हत्येनंतर चेतन यांनी त्यांचे कॉल्स, हिस्टरी, चॅट्स डिलीट केले होते. आपल्याविरोधात कोणताही पुरावा पोलिसांना सापडू नये यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले असावे. मात्र पोलिसांनी सिया आणि चेतनचा फोन ताब्यात घेतला असून फॉरेन्सिक एक्सपर्टच्या मदतीने डिलीट केलेला सगळा डेटा परत मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

एकमेकांवर करतायत दोषारोपण

दरम्यान, पुणे पोलीस आज दुपारी दोन्ही आरोपींना वडगाव दंडाधिकारी न्यायालयात हजर करणार आहेत; यापूर्वी त्यांना 23 जून रोजी पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान सिया आणि चेतन या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं, त्यामुळेच तिने त्याचा काटा काढण्याचं ठरवलं. चेतनसोबत आखलेल्या नियोजित कटानुसार 18 जून रोजी त्या दोघआंनी लोहगड किल्ल्यावरील एका कड्यावरून केतनला खाली ढकलून त्याचा बळी घेतला, हे त्यांनी मान्य केलं. मात्र, आता दोघेही हत्येचा दोष एकमेकांवर ढकलून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या प्रेमासाठी त्यांनी हा डाव रचला, पोलिस कोठडीत गेल्यावर ते प्रेम लगेच संपलं असून आता ते फक्त आपापला जीव वाचवण्यात मग्न आहेत.

पोलिसांना दिलेल्या जबाबात सियाने एक विचित्र कारण दिले; तिने दावा केला की केतनला टक्कल होतं आणि तो विग वापरत असे. मात्र त्याचं विग लावणं सियाला आवडत नव्हतं आणि त्यामुळेच तिला लग्न मोडायचं होतं. यावर प्रतिक्रिया देताना केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी सांगितले होतं की, लग्न ठरण्यापूर्वीच, त्यांनी गोयल कुटुंबाला केतन विग वापरत असल्याबद्दल कल्पना दिली होती. तसेच, केतनला ट्रेकिंगला नेण्याचा आग्रह खुद्द सियानेच धरला होता, असाही दावा विशाल अग्रवाल यांनी केला होता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.