Bhambavali Vajrai Waterfall : देशातील सर्वात उंच 'भांबवली वजराई' धबधबा ओसंडून लागला वाहू; जम्मू-काश्मीरच्या पर्यटकांनी काढलं पहिलं तिकीट, पाहा मनमोहक रूप
esakal July 05, 2026 01:45 AM

कास (सातारा) : भांबवली परिसरात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देशातील सर्वात उंच मानल्या जाणाऱ्या भांबवली वजराई धबधब्याने (Vajrai Waterfall Satara) पुन्हा एकदा रौद्र आणि मनमोहक रूप धारण केले आहे. धबधबा ओसंडून वाहू लागल्याने यंदाच्या पर्यटन हंगामाचा आज (ता.४) उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

भांबवली पर्यटन प्रमुख रविंद्र बळीराम मोरे यांच्या हस्ते नारळ फोडून पर्यटन हंगामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी चंद्रकांत मोरे, दिलीप मोरे, हणुमंत मोरे, विठ्ठल माने, तानाजी जाधव, लक्ष्मण सुर्वे यांच्यासह ग्रामस्थ आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, जम्मू-काश्मिरमधून आलेल्या पर्यटकांनी पहिले तिकीट घेऊन यंदाच्या पर्यटन हंगामाची औपचारिक सुरुवात केली.

UNESCO Kas Plateau : कास पठारावर अवतरला जागतिक स्तरावर दुर्मीळ असलेला 'सातारी तुरा'; समुद्रसपाटीपासून 1000 मीटर उंचीवर उगवणारी 'ही' वनस्पती नेमकी आहे तरी काय?

धबधब्याकडे जाण्यासाठी पर्यटकांना घनदाट जंगलातून सुमारे दोन किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. या ट्रेकिंगदरम्यान पावसाची रिपरिप, हवेतला गारवा, ओढ्यांमधून वाहणाऱ्या पाण्याचा मंजुळ नाद आणि पानांचा सळसळाट यामुळे पर्यटकांना निसर्गाची अनोखी संगीत मैफल अनुभवायला मिळते. धबधब्याचा प्रचंड जलप्रपात आणि सभोवतालचा निसर्गरम्य परिसर पाहून पर्यटक अक्षरशः मंत्रमुग्ध होतात.

थंडगार आणि आल्हाददायक वातावरण, हिरवाईने नटलेले डोंगर आणि धबधब्याचे विहंगम दृश्य मनाला वेगळाच आनंद देत असल्याचे पर्यटक सांगत आहेत. दोन किलोमीटरचा पायी प्रवासही निसर्गसौंदर्यामुळे थकवा जाणवू देत नाही. यावर्षी मार्गातील दोन ओढ्यांवर उभारण्यात आलेले छोटेखानी पूल पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र ठरत असून, अनेक पर्यटक तेथे आवर्जून छायाचित्रे आणि सेल्फी काढताना दिसत आहेत.

White Mongoose VIDEO : कोकणात निसर्गाचा चमत्कार! चिपळूणमध्ये आढळले दुर्मीळ 'पांढरे मुंगूस'; व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, काय आहे पांढऱ्या रंगामागचं कारण?

दरम्यान, पुढील वर्षापर्यंत धबधब्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी शासनाकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती पर्यटन प्रमुख रविंद्र मोरे यांनी दिली. पावसाळा संपल्यानंतर पायऱ्या, रेलिंग, गॅलरी, पार्किंगसाठी पेव्हर ब्लॉक आदी मूलभूत सुविधांची कामे हाती घेतली जाणार आहेत.

Rare Ganesh idol in Koyna Dam : ऋषी मुद्रेतील बैठक अन् 'ढोकरा शैली'! कोयना धरणाच्या गाळात सापडलेली दुर्मीळ गणेशमूर्ती नेमकी किती जुनी? उलगडणार जुन्या संस्कृतीचा वारसा

याबाबत रविंद्र मोरे म्हणाले, "बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भैय्या भोसले यांनी धबधबा विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याची ग्वाही दिली आहे. तसेच उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनक्षेत्रपाल संदीप जोपळे आणि सहायक पोलिस निरीक्षक तांबे यांचेही चांगले सहकार्य लाभत आहे."

दरम्यान, धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे. त्यामुळे पर्यटकांनी धबधब्याच्या अगदी जवळ जाण्याचा मोह टाळावा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन स्थानिक प्रशासन समितीने केले आहे. पर्यटकांनी सुरक्षित अंतरावरून धबधब्याचे विहंगम सौंदर्य अनुभवावे आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा आनंद घ्यावा, असेही समितीने म्हटले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.